DC vs RR: 10 वर्षानंतर दुसऱ्यांदा असं घडलं! राजस्थानच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद
IPL 2021: याआधी आयपीएल 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. जेव्हा त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पॉवर प्लेमध्ये दोन बाद 15 धावा केल्या होत्या.
Delhi Capitals vs Rajasthan Royals: अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2021) 36 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या नावावर एक अत्यंत लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला आहे. खरं तर दिल्ली कॅपिटल्सच्या 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ पॉवर प्लेमध्ये एकही चौकार मारू शकला नाही. त्यांनी पहिल्या सहा षटकांत तीन गडी गमावून कोणत्याही चौकाराशिवाय 21 धावा केल्या.
गेल्या 10 वर्षात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एखाद्या संघाला पॉवर प्लेमध्ये एकही चौकार मारता आला नाही. याआधी आयपीएल 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पॉवर प्लेमध्ये चेन्नईला एकही चौकार मारता आला नव्हता. चेन्नई या पॉवर प्लेमध्ये दोन विकेट गमावून वेकळ 15 धावा करु शकला होता.
दिल्लीच्या 155 धावा..
प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणारा सलामीवीर शिखर धवन चौकाराच्या मदतीने आठ चेंडूंमध्ये केवळ आठ धावा करू शकला. त्याचबरोबर पृथ्वी शॉची बॅटही पुन्हा एकदा शांत राहिली. तो 12 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
श्रेयस अय्यर आणि कर्णधार पंत यांनी दोन्ही सलामीवीर केवळ 21 धावांवर बाद झाल्यानंतर डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. अय्यरने 32 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्याचवेळी पंत 24 चेंडूत दोन चौकारांसह केवळ 24 धावा करू शकला.
दिल्ली चांगल्या स्थितीत आली अन् दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर शिमरॉन हेटमायरने राजस्थानच्या फलंदाजांवर हल्ले करायला सुरुवात केली. त्याने 16 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. मुस्तफिजुर रहमानने हेटमायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर अक्षर पटेल सात चेंडूत 12 धावा करून बाद झाला. मात्र, मार्कस स्टोइनिसच्या जागी संघात सामील झालेला ललित यादव 15 चेंडूत 14 धावांवर नाबाद परतला आणि आर अश्विनने सहा चेंडूत सहा धावा केल्या. दोघांनीही दिल्लीचा स्कोर 150 च्या पुढे नेला.
दुसरीकडे, राजस्थानकडून मुस्तफिजूर रहमानने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त 22 धावा देऊन दोन बळी घेतले. याशिवाय चेतन साकरियाने 33 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याचबरोबर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.