IPL 2022 : मुंबईने वाट लावली, चेन्नईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात
IPL 2022 : यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा विजय होय.. तर चेन्नईचा आठवा पराभव झालाय. या पराभवासह चेन्नईचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेय.
Chennai Super Kings knocked out of the IPL 2022 : डॅनिअल सॅम्सच्या भेदक माऱ्यानंतर तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा विजय होय.. तर चेन्नईचा आठवा पराभव झालाय. या पराभवासह चेन्नईचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेय. मुंबईनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचे आव्हानं संपुष्टात आलेय. मुंबईचे याआधीच स्पर्धेतील आव्हान संपलेले आहे. मुंबईने जाता जाता चेन्नईचीही वाट लावली...
चेन्नई आतापर्यंत आयपीएलचे 13 हंगाम खेळली आहे. यापैकी 11 वेळा ते प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. 2020 आणि 2022 मध्ये चेन्नई प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. याआधी प्रत्येक हंगामात चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. चेन्नई तब्बल 11 वेळा प्लेऑफमध्ये पोहचली आहे. यापैकी तब्बल चार वेळा चेन्नईने आयपीएल चषक उंचावलाय. पाच वेळा चेन्नई उपविजेता राहिली आहे. तर दोन वेळा सेमीफायनलपर्यंत धडक मारली.
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघ प्लेऑफमध्ये नसण्याची ही दुसरी वेळ होय. 2020 मध्ये चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचता आले नव्हते, त्यानंतर आता चेन्नईचे आव्हान संपुष्टात आलेय. पाच वेळा आयपीएल चषक विजेता मुंबई आणि चार वेळा चषक जिंकणारा चेन्नई संघ यंदा प्लेऑफमध्ये दिसणार नाही.
सर्वात यशस्वी संघ तळाशी -
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई आणि चेन्नईला ओळखले जाते. दोन्ही संघाकडे मिळून 9 आयपीएलचे चषक आहेत. पण या दोन्ही संघाला यंदा प्लेऑफमध्ये पोहचता येणार नाही. मुंबईच्या संघाला 12 सामन्यात 9 पराभव स्वीकारावे लागलेत तर चेन्नईच्या संघाला 12 सामन्यात 8 पराभवाचा सामना करावा लागलाय. चेन्नई नवव्या तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे.
आयपीएलमधील चेन्नईची कामगिरी -
2008 - उपविजेते
2009 - सेमी फायनल.
2010 - विजेते.
2011 - विजेते.
2012 - उपविजेते.
2013 - उपविजेते
2014 - सेमी फायनल
2015 - उपविजेते.
2018 - विजेते.
2019 - उपविजेते
2020 - लीग स्टेज
2021 - विजेते.
2022 - लीग स्टेज.
सामन्यात काय झाले?
तिलक वर्माच्या 34 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने चेन्नईवर पाच गड्यांनी विजय मिळवलाय. कर्णधार एमएस धोनीच्या 36 धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नईने दिलेल्या 98 धावांच्या आव्हानाचा मुंबईने यशस्वी पाठलाग केला. मुंबईने 14.5 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. डॅनिअल सॅम्स आणि तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार झाले.