Rohit Sharma : मुंबई इंडियन्सचे सलग दोन पराभव, आकाश अंबानींची रोहित शर्मासोबत चर्चा,मुंबईला सूर गवसणार
Rohit Sharma : मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये सूर गवसलेला नाही. मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू रोहित शर्मा याची आकाश अंबानी यांनी भेट घेतली.
हैदराबाद : मंबई इंडियन्स (Mumbai Indians)नं यंदाचं आयपीएलचं पर्व सुरु होण्यापूर्वी मोठे निर्णय घेतले. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं गुजरात टायटन्सच्या संघातून हार्दिक पांड्याला आपल्या संघात परत घेतलं. हार्दिक पांड्याला संघात घेताना त्याला मुंबईचं कर्णधारपद देण्यात आलं. मुंबईचं कर्णधारपद 2013 ते 2023 पर्यंत रोहित शर्माकडे होते. रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सला पाचवेळा विजेतेपद मिळवून दिलं होतं. मुंबईला 2021, 2022 आणि 2023 मध्ये विजेतेपद मिळालं नव्हतं. यामुळं मुंबई इंडियन्सनं कर्णधार बदलण्याचा निर्णय घेत हार्दिक पांडयाकडे नेतृत्त्वाची संधी दिल्याचं बोललं गेलं. रोहित शर्माच्या चाहत्यांकडून मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर टीका करण्यात आली होती. आता आयपीएल सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आकाश अंबानी (Akash Ambani) यांनी रोहित शर्मासोबत चर्चा केली आहे.
रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांची भेट
मुंबई इंडियन्सनच्या गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधातील पराभवानंतर संघाचे मालक असलेल्या अंबानी परिवारातील आकाश अंबानी यांनी रोहित शर्माची भेट घेतली आहे. रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांच्यात राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळालं.
Akash Ambani having a chat with Rohit after the loss. pic.twitter.com/tCA3VrdI5K
— Johns. (@CricCrazyJohns) March 27, 2024
मुंबई कमबॅक करणार?
मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्यांमधील पराभव एकतर्फी झालेला नव्हता. मुंबईचा पराभव अटतटीच्या लढतीत झाला. गुजरात विरुद्ध मुंबईचा पराभव 6 धावांनी झाला होता. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईचा पराभव 31 धावांनी झाला आहे. हैदराबादनं 3 विकेटवर 277 धावा केलेल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 6 विकेटवर 246 धावा करु शकला. म्हणजेच मुंबईनं दोन्ही मॅचमध्ये अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारला आहे. त्यामुळं आगामी सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स कमबॅक करेल अशी आशा मुंबईच्या चाहत्यांना आहे.
मुंबई इंडियन्सला सहावं विजेतेपद मिळणार?
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंतच्या आयपीएल स्पर्धांमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईचं कर्णधारपद रोहित शर्माकडे आल्यानंतर 2013 च्या स्पर्धेत पहिलं विजेतेपद पटकावलं गेलं होतं. रोहित शर्माच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पुढच्या काळात 2015, 2017, 2019, 2020 या चार वर्षांमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. 2021 ते 2023 च्या आयपीएलमध्ये मुंबईला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळं मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याला संघात परत आणत रोहित शर्माऐवजी त्याच्याकडे टीमचं नेतृत्त्व दिल्याचं बोललं जातं. मात्र, पहिल्या दोन मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे.
संबंधित बातम्या :