IPL 2022 : कुणी 37 तर कुणी 35... आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज
IPL 2022 Marathi News : मुंबईच्या डॅनिअल सॅम्सचं हे षटक आयपीएलच्या सर्वात महागड्या षटकापैकी एक आहे.
Most Run In A Over : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर सामना होणार आहे. यंदाच्या हंगामात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा पराभव केला होता. या सामन्यात कोलकात्याच्या पॅट कमिन्सने डॅनिअल सॅम्सच्या एका षटकांत धावांचा पाऊस पाडला होता. पॅट कमिन्सने डॅनिअल सॅम्सच्या एका षटकात तब्बल 35 धावा चोपल्या होत्या. सॅम्सचं हे षटक आयपीएलच्या सर्वात महागड्या षटकापैकी एक आहे. आयपीएलमध्ये याआधीही एका षटकात 30 पेक्षा जास्त धावा निघाल्या आहेत. पाहूयात आयपीएलमध्ये एका षटकात निघालेल्या सर्वाधिक धावा आणि गोलंदाजाबाबत...
हर्षल पटेल -
आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने एका षटकात तब्बल 37 धावा खर्च केल्या होत्या. चेन्नईच्या रवींद्र जाडेजाने 2021 मध्ये हर्षल पटेलची गोलंदाजी फोडून काढली होती. या षटकात तब्बल 37 धावा निघाल्या होत्या. आयपीएलमधील हे सर्वात महागडे षटक होय... या हंगामात हर्षल पटेलला पर्पल कॅप मिळाली होती.
प्रशांत परमेश्वरन -
2011 मध्ये कोच्ची टस्कर्सच्या प्रशांत परमेश्वरनच्या एका षटकात 37 धावा निघाल्या होत्या. आरसीबीच्या फलंदाजांनी प्रशांत परमेश्वरनच्या षटकात 37 धावा वसूल केल्या होत्या. आयपीएलमधील सर्वात महागड्या षटकांपैकी एक आहे.
डॅनियल सॅम्स
कोलकाता नाइट राइडर्सच्या (KKR) पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्स (MI) विरोधात वादळी खेळी केली होती. या सामन्यात कमिन्सने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात डॅनियल सॅम्सच्या एका षटकात कमिन्सने 35 धावा चोपल्या होत्या. कमिन्सच्या वादळी खेळीच्या जोरावर कोलकात्याने मुंबईचा सहज पराभव केला.
परविंदर अवाना
एका षटकांत सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजामध्ये परविंदर अवाना याच्या नावाचाही समावेश आहे. 2014 मध्ये पंजाब किंग्स (PBKS) च्या परविंदर अवानाने एका षटकात 33 धावा दिल्या होत्या. चेन्नई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात परविंदरच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पडला होता.
रवी बोपारा
इंग्लंडचा माजी अष्टपैलू रवी बोपाराचाही या नकोशा विक्रमांमध्ये समावेश आहे. बोपाराने एका षटकात 33 धावा दिल्या होत्या. पंजाब आणि कोलकाता यांच्यात हा सामना रंगला होता.