(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 Auction : मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स होणार सहभागी, 'या' तीन खेळाडूंवर असणार संघ व्यवस्थापनाची नजर
IPL Auction Mumbai Indians: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्समधून बरेच दिग्गज बाहेर पडल्याने त्यांना नवे खेळाडू विकत घ्यावे लागतील.
IPL Auction Mumbai Indians: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. ज्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये पुन्ह जुन्या फॉर्मात परतण्याचा संघाचा प्रयत्न असेल. अशात संघातून बरेच दिग्गज खेळाडू वेगळे झाल्याने आता आगामी लिलावात मुंबई संघाला बऱ्याच स्टार खेळाडूंची गरज असेल. आगामी आयपीएलचा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे दरम्यान मुंबई इंडियन्सलाही अनेक खेळाडू विकत घ्यावे लागणार असून काही खेळाडू असतील ज्यांना प्रत्येक संघ आपल्यामध्ये सहभागी करुन घ्यायला उत्सुक असेल. तर मुंबईच्या संघाला कोणते खेळाडू हवे आहेत आणि संघात त्यांची भूमिका काय असेल? याबद्दल जाणून घेऊ....
मधल्या फळीत मनीष पांडेला मिळू शकते जागा
भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मुंबईकडे सध्या चार चांगले फलंदाज आहेत. मात्र, त्यांना आणखी काही चांगल्या फलंदाजांची गरज भासणार आहे आणि अशा परिस्थितीत संघाला मनीष पांडे किंवा मयंक अग्रवालसारख्या अनुभवी खेळाडूवर बाजी लावता येईल. विशेषत: मनीष मुंबईसाठी अधिक चांगला सिद्ध होऊ शकतो कारण तो मधल्या फळीतील फलंदाज आहे मनीषचा फॉर्म काही काळापासून चांगला नसला तरी त्याच्यात सामना फिरवण्याची ताकद आहे.
उनाडकटला पुन्हा सामिल करुन घेऊ शकते मुंबई
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त इतर कोणताही भारतीय वेगवान गोलंदाज मुंबईजवळ दिसत नाही. मुंबईचा संघ ज्या प्रकारे अनुभवी खेळाडूंना पसंती देतो, ते पाहता त्यांची नजर नक्कीच जयदेव उनाडकटवर असेल. उनाडकटकडे अनुभवाची कमतरता नाही आणि तो मुंबई संघासाठी चांगला वेगवान गोलंदाज ठरू शकतो. याआधी तो मुंबईकडून खेळला देखील आहे.
स्टोक्सवर मोठी बोली लावू शकतो मुंबईचा संघ
मुंबईकडे परदेशी फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही आहेत, पण संघात विदेशी अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आहे. या लिलावात बेन स्टोक्सला जास्त मागणी असणार आहे कारण टी20 विश्वचषक इंग्लंडला जिंकवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. त्यात स्टोक्सही यंदाच्या हंगामात खेळणार आहे, त्यामुळे त्याला विकत घेणे कोणत्याही संघासाठी फायदेशीर ठरू शकते. पोलार्ड, पांड्या या दिग्गजांची कमी भरुन काढण्यासाठी स्टोक्सला मुंबईचा संघ सामिल करुन घेण्यासाठी मोठी बोली नक्कीच लावू शकतो.