IPL 2024: यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?; सुनील गावसकर यांची भविष्यवाणी, संघाचं नाव सांगितलं!
IPL 2024: आज बंगळुरु आणि राजस्थानच्या सामन्यात जो जिंकेल तो संघ हैदराबाद विरुद्ध क्वालिफायर 2 सामना खेळेल. 24 मे 2024 रोजी क्वालिफायर 2 सामना रंगणार आहे.
IPL 2024 RCB: सनरायझर्स हैदराबादचा (SRH) आठ विकेटने पराभव करत कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) फायनलचे तिकिट मिळवले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या क्वालिफायर 1 सामन्यात कोलकात्याने शानदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली. हैदराबादने दिलेले 160 धावांचे माफक आव्हान कोलकाताने आठ विकेट्स आणि 38 चेंडू राखून सहज पार केले.
क्वालिफायर 2 चा सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात रंगणार आहे. आज बंगळुरु आणि राजस्थानच्या सामन्यात जो जिंकेल तो संघ हैदराबाद विरुद्ध क्वालिफायर 2 सामना खेळेल. 24 मे 2024 रोजी क्वालिफायर 2 सामना रंगणार आहे. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी बंगळुरुचा संघ यंदा आयपीएलचं जेतेपद पटकावेल, असं सांगितलं आहे. (Sunil Gavaskar picks RCB as the IPL 2024 Winner)
Sunil Gavaskar picks RCB as the IPL 2024 Winner. 🏆 pic.twitter.com/AHTz3w1KEl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2024
बंगळुरुने तीनवेळा खेळलाय अंतिम सामना-
बंगळुरुचा संघ तीनवेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात दाखल झाला होता. परंतु बंगळुरुला जेतेपद पटकावण्यात यश मिळाले नाही. यंदा आयपीएलचं पहिलं जेतेपद पटकवण्यासाठी बंगळुरुचा संघ खूप उत्सुक आहे. बंगळुरुने सगळ्यात पहिले 2009 साली अंतिम सामना खेळला होता. यानंतर 2011 आणि 2016 साली बंगळुरुने अंतिम सामना खेळला होता.
बंगळुरुचे चाहते उत्सुक-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ प्ले ऑफच्या फेरीत पोहचल्यानंतर संघातील खेळाडूंसह बंगळुरुचे चाहते, आजी-माजी खेळाडू खूप उत्साहित आहेत. सोशल मीडियावर देखील बंगळुरुने यंदातरी आयपीएलचं जेतेपद पटकावं, अशी प्रतिक्रिया दिली जात आहे. चेन्नई आणि बंगळुरुचा सामना असताना माजी खेळाडू ख्रिस गेलने भारतात येऊन चिन्नास्वामी मैदानावर उपस्थिती लावली. यानंतर आता एबी डिव्हिलीयर्स देखील बंगळुरुला पाठिंबा देण्यासाठी भारतात दाखल झाला आहे. मुंबईला येणे खूप आवडते, मी आयपीएल नॉक आउट्ससाठी येथे आलो आहे. आरसीबीचा संघ प्ले ऑफसाठी पात्र झाला आहे, आम्ही सर्व खूप उत्साहित आहोत, असं एबी डिव्हिलीयर्सने सांगितले.