साई सुदर्शनने आयपीएलमध्ये इतिहास रचला...; सचिन तेंडुलकरचा 14 वर्ष जुना विक्रम मोडला
IPL 2024 CSK vs GT: गुजरातकडून शुभमन गिलने (Shubhman Gill) 104 धावा, तर साई सुदर्शनने (Sai Sudarshan) 103 धावा केल्या.
IPL 2024 CSK vs GT: गुजरात टायटन्सने (GT) चेन्नई सुपर किंग्सला (CSK) विजयासाठी 232 धावांचं लक्ष्य दिलं आहे. गुजरातकडून शुभमन गिलने (Shubhman Gill) 104 धावा, तर साई सुदर्शनने (Sai Sudarshan) 103 धावा केल्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना धुतलं. चेन्नईकडून तुषार देशपांडेने 2 विकेट्स पटकावल्या. सुदर्शनने 5 चौकार आणि 7 षटकार मारले. तर गिलच्या बॅटमधून 9 चौकार आणि 5 षटकार आले. एकेकाळी गुजरात 250 चा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण चेन्नईने शेवटच्या 4 षटकांत केवळ 35 धावा देत धावसंख्या रोखली.
गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सामन्यात साई सुदर्शनने 51 चेंडूत 103 धावांची खेळी खेळली. यासह तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. साई सुदर्शनने याबाबत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. साई सुदर्शनने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 12 सामन्यांत 520 धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला- (Sai Sudharsan broke Sachin Tendulkar's record)
आत्तापर्यंत IPL मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर होता. सचिनने 2010 मध्ये 31 डाव खेळून एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या, ज्यात त्याची सरासरी 34.8 होती. आता गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने अवघ्या 25 डावात एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याआधी, ऋतुराज गायकवाडने देखील आयपीएलमध्ये हजार धावा करण्यासाठी 31 डाव घेतले होते.
Sai Sudharsan broke Sachin Tendulkar's record. 🤯 pic.twitter.com/zmsGz1SwkK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 10, 2024
21 डावात एक हजार धावा-
आता आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज साई सुदर्शन आहे. पण त्याच्या आधीही तीन फलंदाजांनी 25 किंवा त्यापेक्षा कमी डावात एक हजार धावा केल्या होत्या. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वात जलद हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू शॉन मार्शच्या नावावर होता. मार्शला केवळ 21 डावांत आणि त्याच्यानंतर लेंडल सिमन्सने 23 डावांत एक हजार धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले. या यादीत साई सुदर्शन आता मॅथ्यू हेडनसोबत तिसऱ्या स्थानावर आहे. हेडनने 25 डावात आयपीएलच्या 1000 धावाही पूर्ण केल्या.