(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू भिडणार, कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन?
IPL 2023, RR vs RCB: आजच्या आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडणार आहेत.
IPL 2023, RR vs RCB: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यातील 60 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाईल. जिथे संजू सॅमसन आणि फाफ डू प्लेसिस 16व्या सीझनमध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना आरसीबीनं जिंकला होता. तसेच, आरआर त्यांच्या पराभवाचा बदला घेणार आहे.
राजस्थान विरुद्ध बंगळुरू हेड टू हेड
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये राजस्थाननं 12 आणि बंगळुरूनं 14 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचा आजचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे, जिथे दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा भिडले आहेत. या सामन्यांमध्ये राजस्थाननं 4 तर बंगळुरूनं 3 सामने जिंकले आहेत.
राजस्थान रॉयल्सनं सलग तीन पराभवानंतर गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध नऊ विकेट्सनी मोठा विजय मिळवला. ज्यामुळे टीम सध्या फॉर्मात आहे. या सामन्यात जायस्वालनं 47 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या तर कर्णधार संजू सॅमसननं 48 धावांचं योगदान दिलं आहे. तर आरसीबीसाठी आजचा सामना खरंच करो या मरोच्या स्थितीप्रमाणेच असणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बंगळुरूला कोणत्याही किमतीत हा सामना जिंकावा लागेल. राजस्थान रॉयल्सचीही स्थिती काहीशी अशीच आहे. आरसीबी 11 सामन्यांत 10 गुणांवर आहे, तर रॉयल्स 12 सामन्यांत 12 गुण आहेत. आरसीबीसाठी आतापर्यंत फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखलं आहे, तर ग्लेन मॅक्सवेलही उत्तम फॉर्मात आहे. संघाला मात्र मधल्या फळीतील फलंदाज महिपाल लोमरोर, अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांच्या पाठिंब्याची गरज आहे.
राजस्थान आणि बंगळुरूचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ :
यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा संभाव्य संघ :
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदु हसरंगा, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.
पॉईंट टेबलमध्ये दोन्ही संघ कोणत्या स्थानी?
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉईंटटेबलमधील स्थितीबाबत बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या संघानं त्यांच्या 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. तसेच, RCB 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. बंगळुरूच्या संघानं 11 सामन्यांत 5 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. दुसरीकडे, जर आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. पण घरच्या मैदानावर आरआरला पराभूत करणं आरसीबीसाठी सोपं नसणार आहे, एवढं मात्र नक्की
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.