IPL 2023 Points Table : रोमाचंक लढतीत पंजाबचा विजय, पराभवानंतर गुणतालिकेत राजस्थानचं स्थान काय? जाणून घ्या...
IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 6 संघांनी 2-2 सामने खेळले आहेत. तर सहा संघाना अद्यापही आपलं खातं उघडता आलेलं नाही.
IPL 2023 Points Table : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील आठवा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात पार पडला. या अटीतटीच्या लढतीत पंजाब संघाने राजस्थानचा पाच धावांनी पराभव केला. रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सकडून राजस्थान रॉयल्सचा यंदाच्या हंगामातील पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. फलंदाजांच्या पाठोपाठ गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पंजाब किंग्सने (PBKS) राजस्थान रॉयल्सवर (RR) मजल मारली. पंजाबने दिलेल्या 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ केवळ 192 धावांचा पल्ला गाठू शकला. या विजयानंतर पंजाब किंग्स संघाकडे 4 गुण झाले आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला होता.
IPL 2023 Points Table : गुणतालिकेत गुजरात टायटन्स आघाडीवर
पंजाबने या सामन्यात राजस्थानला हरवत गुणतालिकेतही मागे सोडलं आहे. आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुजरातचा संघ 4 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सकडेही 4 गुण आहेत, पण चांगल्या नेट रनरेटमुळे गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर आहे, तर पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), तर चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. पाचव्या स्थानांवर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आहे. या मागोमाग सहावा क्रमांक चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) संघ आहे. या सर्व संघांकडे प्रत्येकी 2-2 गुण आहेत.
IPL 2023 Points Table : सामना गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सला धक्का
राजस्थान विरुद्ध पंजाब सामन्यापूर्वी, राजस्थान रॉयल्स एका विजयासह दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र हा सामना गमावल्यानंतर संघ दोन स्थान खाली घसला आहे. आता राजस्थान चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पंजाब थेट पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याशिवाय पंजाबच्या विजयाने लखनौलाही धक्का बसला आहे. कारण केएलचा संघ आता चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. गुजरात टायटन्स दोन विजय आणि चांगल्या नेट रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहे.
IPL 2023 Points Table : सहा संघाना अद्यापही खातं उघडता आलेलं नाही
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सातव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) आठव्या तर, मुंबई इंडियन्स (MI) नवव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) दहाव्या स्थानावर आहे. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 6 संघांनी 2-2 सामने खेळले आहेत. तर सहा संघाना अद्यापही आपलं खातं उघडता आलेलं नाही. तसेच चार संघ गुणतालिकेत अद्याप शून्य गुणांसह आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पंजाबचा भांगडा ! अटीतटीच्या लढतीत राजस्थानचा पाच धावांनी पराभव