CSK vs GT Final : अंतिम सामन्यावर पावसाचं संकट! पावसामुळे चेन्नई विरुद्ध गुजरात सामना रद्द झाल्यास विजेता संघ कोणता?
IPL 2023 Final : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यावर पावसाचं संकट घोंघावत आहे. सामन्यावेळी पाऊस पडल्यास आयपीएल विजेता कसा ठरणार ते जाणून घ्या.
GT vs CSK, IPL Final 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सामना आज चेन्नई आणि गुजरात यांच्यात रंगणार आहे. सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेल्या या सामन्यावर पावसाचं संकट (IPL Match Rain Prediction) घोंघावत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आजचा पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यास सामन्यासाठी आणखी एक राखीव दिवस असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे.
अंतिम सामन्यावर पावसाचं सावट
आयपीएल 2023 मधील अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. अॅक्यू वेदर (AccuWeather) च्या हवामान अंदाजानुसार, अहमदाबादमध्ये 56 टक्के ढगाळ वातावरण असनू आणि संध्याकाळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. 'बीबीसी वेदर'ने वर्तवलेल्या अंदाजानुसारन अंतिम सामन्यावेळी 48 टक्के आर्द्रतेसह हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्यावर पावसाचं संकट आहे.
चेन्नई आणि गुजरात सामना रद्द होणार?
दरम्यान, पावसामुळे आजचा सामना प्रभावित झाल्यास, अशी परिस्थिती गृहीत धरून एक राखीव दिवस उपलब्ध असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. या मीडिया रिपोर्टनुसार रविवारचा अंतिम सामना रद्द झाल्यास हा सामना पुढील दिवशी 29 मे रोजी रात्री 8.00 वाजता खेळवला जाईल.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास पुढे काय?
याशिवाय पावसामुळे सामन्यात विलंब झाल्यास आवश्यक 20 षटकांपैकी काही षटकांची संख्या कमी केली जाण्याचीही शक्यता आहे. यानुसार, प्रत्येक संघाला किमान पाच षटके फलंदाजी करण्याची संधी मिळेल. आजच्या सामन्यासाठीची शेवटची वेळ रात्री 12.26 वाजता असेल, त्यानंतरही सामना न झाल्यास हा सामना सोमवारी खेळवण्यात येईल.
या व्यतिरिक्त, आयपीएलचा अंतिम सामना 28 मे रोजी सुरू झाला असेल आणि त्यानंतर सामना रद्द झाल्यास, उर्वरीत खेळ त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी खेळण्यात येईल. म्हणजे रविवारी किमान एक चेंडू टाकला असेल, तर त्यानंतरचा शिल्लक सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येईल. म्हणजेच या नियमानुसार, स्पर्धा आदल्या दिवशी जिथे थांबवण्यात येईल तिथूनच पुढे दुसऱ्या दिवशीचा सामना खेळवण्यात होईल.