Deepak Chahar Injury : चेन्नईला मोठा झटका! दीपक चहरची दुखापत गंभीर, पुढील काही सामन्यांसाठी बाहेर?
IPL CSK Deepak Chahar Injury : मुंबई इंडियन्सच्या (MI) सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरला सामन्यादरम्यान दुखापत झाली.
IPL 2023, CSK vs MI : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सात गडी राखून पराभव केला. शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर हा रोमांचक सामना पाहायला मिळाला. पण या सामन्यादरम्यान चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरला सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे दीपक चहरला मैदानाबाहेर जावं लागलं. आता दीपक चहरबाबतच्या तब्येतीबाबतची अपडेट समोर येत असून त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा झटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान दीपक चहरला झालेली दुखापत गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या दुखापतीमुळे दीपक चहरला किमान चार ते पाच सामन्यांमधून बाहेर बसावं लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वानखेडे स्टेडियमवर मुंबईविरुद्धच्या सामन्यात दीपक चहरची दुखापत हा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघासाठी मोठा धक्का होता. चहरने पहिलं षटक टाकलं त्यानंतर तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. चहल हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे त्रस्त आहे. चहरचा दुखापतीशी जुना संबंध आहे. या दुखापतीमुळे चहर इंडियन प्रीमियर 2022 च्या संपूर्ण हंगामात खेळू शकला नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून चहरला दुखापतीमुळे त्रस्त आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर चहर काहीसा अस्वस्थ दिसला. यानंतर फिजिओला मैदानावर बोलावण्यात आलं. चहरनं षटक संपवलं आणि त्यानंतर तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. आता त्याची ही समस्या गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चेन्नई संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
चेन्नईचा मुंबईवर सात विकेट्सने विजय
वानखेडेच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेटने पराभव करत वस्त्रहरण केलेय. आधी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवले, त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. मुंबईने दिलेले 158 धावांचे माफक आव्हान चेन्नईने सात विकेट आणि 11 चेंडू राखून आरामात पार केले. मराठमोळ्या अजिंक्य राहणे याने या सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तर रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय ठरला तर हा मुंबईचा दुसरा पराभव आहे.