राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्विकारणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य रायगडमधील कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे.
Mahendra Thorve on Tatkare Family : आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्विकारणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य रायगडमधील कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे. रायगडचे पालकमंत्री पद जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या एकमेव निवडून आलेल्या आदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी काल पासून तीव्र संताप व्यक्त करत आहेत. थोरवे यांनी पालकमंत्रीपदाबाबतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता
कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण तटकरे फॅमिलिला स्विकारणार नाही अशा स्वरूपातील वक्तव्य केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या उठावात रायगडच्या आमदारांचा मोठा वाटा
शिवसेनेच्या उठावात रायगडच्या आमदारांचा मोठा वाटा आहे. सुरु असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याच काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्या नेतृत्वात आम्ही होतो. खरतर मागच्या वेळेस मंत्रिपदाचे दावेदार असताना भरत गोगावले यांनी संघटनेला बळ देण्यासाठी मागच्या वेळेस मंत्रिपदाचा त्याग केला. खर त्यावेळेस भरत गोगावले पालकमंत्री झाले असते असे थोरवे म्हणाले.
आम्ही उठाव केल्यामुळेच राज्यात सरकार आलं
राज्यात सरकार येण्यासाठी आम्ही जो उठाव केला आणि जे काही परिवर्तन झालं त्यामुळेच सरकार बसल्याचे थोरवे म्हणाले. खातं कोणतं दिलं यांबाबत मी काहीच बोलणार नाही. परंतू, भरत गोगावले यांना कॅबिनेटमंत्री केलं तेव्हा आमची सर्वांची एकच मागणी होती की पालकमंत्री देखील गोगावले यांनाचं दिले पाहिजे. आघाडी सरकार असताना उध्दव ठाकरे यांनी सेनेचे 3 आमदार असताना चुकीचा निर्णय घेतला होता. त्याविरोधातही आम्ही उठाव केला होता असे थोरवे म्हणाले.
गोगावले यांना का डावललं?
राज्यात बहुमताने सरकार स्थापन झाले परंतु भाजप आणि सेनेचे तीन तीन आमदार असताना सुध्दा गोगावले यांना का डावललं? असा सवाल यावेळी थोरवे यांनी केला. गोगावले यांना पालकमंत्री करण्याची आमची सर्वांची मागणी असताना सुध्दा असा निर्णय का घेण्यात आला? असा सवाल थोरवे यांनी केला. फडणवीस आणि शिंदे साहेब यांना आम्ही एकमताने भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाबाबत सुध्दा सांगितलेलं असताना असा निर्णय अपेक्षित नव्हता असे थोरवे म्हणाले.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची निवड रद्द
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांनंतरच अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी नाराजी दर्शवली होती. तसेच भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली. त्यामुळे आता रायगड आणि नाशिक जिल्हाच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.