Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Nashik Encroachment : नाशिकच्या चौकात-चौकात अतिक्रमणाचा विळखा पाहायला मिळतोय. नाशिककरांना अतिक्रमणातून मुक्तता कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Nashik News : नाशिक शहर हे झपाट्याने वाढत असून स्मार्ट सिटी (Smart City) कंपनीच्या माध्यमातून देखील अत्याधुनिक सुविधा शहरात उभारली जात आहे. मात्र नाशिकच्या चौकात-चौकात अतिक्रमणाचा (Encroachment) विळखा पाहायला मिळतोय. धार्मिक स्थळे, बाजारपेठा, शासकीय कार्यालयाच्या आवारात देखील मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसून येत आहे. त्यामुळे आता नाशिककर देखील शहरातील अतिक्रमणामुळे हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक शहर (Nashik News) हे कुंभनगरी म्हणून ओळखले जाते. दर बारा वर्षांनी नाशिक शहरात कुंभमेळा भरतो. नाशिक शहराला धार्मिक स्थळांचे शहर म्हणून ओळखले जाते. पंचवटी, तपोवन, रामकुंड आणि गोदावरी नदीच्या परिसरातील काळाराम मंदिर, सीता गुंफा या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक नाशिक शहरात येतात. शहरातील धार्मिक स्थळे आणि बाजारपेठांच्या परिसरातच अतिक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बाजारपेठेत तर अगदी पाय ठेवायला देखील जागा दिसत नाही. वाहनांची बेशिस्त पार्किंगमुळे नाशिककरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शासकीय कार्यालयासमोरील अतिक्रमणाने नाशिककर त्रस्त
तर नाशिक सीबीएस, एमजी रोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरात तर अगदी शासकीय कार्यालयासमोरच अतिक्रमण दिसून येते. त्यामुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने इतरत्र पार्क करून कार्यालयात जावे लागते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे. धार्मिक स्थळांवर तर अगदी दुचाकी वाहन जरी जात असले तरी भाविकांना वाहनाचा धक्का लागून छोटे-मोठे अपघात दररोज घडतात. मात्र या सर्वांना कारणीभूत आहे ते म्हणजे धार्मिक स्थळांवरील वाढलेली अतिक्रमणे.
थेट रस्त्यावर थाटली दुकानं
नाशिक शहरातील पंचवटी-तपोवन या परिसरात सर्वाधिक धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी दररोज भाविकांची गर्दी असते. मात्र, या परिसरात थेट रस्त्यावर दुकाने थाटून बसलेल्या व्यावसायिकांमुळे पर्यटकांसह नाशिककरांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. नाशिक शहरातील या वेगवेगळ्या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणावर नाशिककरांनी महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
अतिक्रमणातून मुक्तता कधी मिळणार?
तसेच, नाशिक शहरातील बस स्थानकांवर देखील अतिक्रमण पाहायला मिळत आहे. प्रवाशांना बस स्थानक सोडून काही अंतर पुढे जाऊन बस पकडावी लागते. कारण थेट बस स्थानकांनाच दोऱ्या बांधून अतिक्रमणधारकांनी आपले हातपाय पसरवल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र यावर महापालिका, अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नाशिक शहरातील अतिक्रमणावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी मात्र शहरात दररोज अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहोत. शहरातील अतिक्रमणाची परिस्थिती लवकरच कमी होईल, असे देखील अधिकारी सांगताना पाहायला मिळत आहे. मात्र, नाशिककरांना या अतिक्रमणातून मुक्तता कधी मिळणार? शहरातील धार्मिक स्थळे, बाजारपेठा, शासकीय कार्यालय या परिसरातील अतिक्रमणाचा विळखा कधी सुटणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा