IPL 2022 : पोलिसांविरोधातच गुन्हा दाखल, खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह महागात, दारुच्या नशेत बायो बबल तोडलं
IPL 2022 : खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बीसीसीआयने बायो बबलची व्यवस्था केली आहे. या बायो बबलमध्ये कुणालाही प्रवेश मिळत नाही. खेळाडूंनाही बायो बबलमध्ये जाण्यासाठी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण कारावा लागतो.
IPL 2022 : कोरोना नियमांचं पालन करत मुंबईमध्ये आयपीएलच्या 15 व्या हंगामाची दणक्यात सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीमुळे मुंबई आणि पुण्यातील मैदानावर आयपीएलमधील लीग सामने आयोजित करण्यात आले आहेत. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बीसीसीआयने बायो बबलची व्यवस्था केली आहे. या बायो बबलमध्ये कुणालाही प्रवेश मिळत नाही. खेळाडूंनाही बायो बबलमध्ये जाण्यासाठी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण कारावा लागतो. पूर्ण सुरक्षा घेत आयपीएलचा रण संग्राम सुरु आहे. पण सुरक्षेसाठी तैणात असलेल्या पोलिसांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आले आहे. पोलिसांनीच बायो बबल तोडल्याचं समोर आले आहे. दारुच्या नशेत खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह पोलिसांना आवरला नाही, ते थेट बायो बबल तोडून फोटो काढण्यासाठी गेले. या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डी वाय पाटील मैदानावर सोमवारी गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना झाला. या सामन्यात हैदराबादने आठ विकेटनं बाजी मारली. पण या सामन्यादरम्यान पोलिसांनी बायो बबल तोडल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय, पीटीआयने याबाबतचं वृत्त दिले आहे. एक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तयार कऱण्यात आलेल्या बायो बबला दोन पोलिसांनी तोडलं आहे. हे दोन्ही पोलीस दारुच्या नशेत होते. या पोलिसांनी खेळाडूंसोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी थेट बायो बबल मोडत खेळाडूंसोबत फोटो घेण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल वर्दीमध्ये होते. रवींद्र मेट (33) आणि नरेंद्र नागपुरे (36) असे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलची नावे आहेत.'
रवींद्र मेट (33) आणि नरेंद्र नागपुरे (36) डी वाय पाटील स्टेडिअममध्ये सुरक्षेसाठी तैणात होते. यावेळी या पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करत खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. ड्युटीवर असताना हे दोन्ही पोलीस दारुच्या नशेत होते. त्यावेळी त्यांना खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह अनावर आला. या पोलिसांनी बायो बबल मोडलं. या पोलिसांवर कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.