IPL 2021: 'या' कारणांमुळे आयपीएल पुढे ढकलावे लागले; बीसीसीआयच्या मोठ्या चुका
मागच्या आयपीएलमध्ये बायो बबलचे व्यवस्थापन रेस्ट्राटा (Restrata) नावाच्या एका व्यावसायिक कंपनीने केले होते, जी ट्रॅकिंग डिव्हाइस आणि बायो सिक्योर सोल्युशन्स प्रदान करण्यात प्रवीण होती.
IPL 2021: आयपीएलमधील खेळांडूसाठी देण्यात आलेली अत्यंत महत्वाची बायो बबल अनेक कारणांनी तोडण्यात आली. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे स्वतःच सर्व काही व्यवस्था करण्याचा बीसीसीआयचा निर्णय. खर्च कमी करणे आणि भारत-आधारित कंपन्यांवर विसंबून राहण्यामुळे सध्याची परिस्थिती ओढावली आहे. संपूर्ण प्रकरण तपशीलवार जाणून घ्या.
1) मागच्या आयपीएल स्पर्धेत बायो बबलची व्यवस्था रेस्ट्राटा (Restrata) नावाची व्यावसायिक कपंनी पहात होती. ही कंपनी ट्रॅकिंग डिवाइस आणि बायो बबल सुरक्षा देण्यात पारंगत होती. यावेळी आयपीएलला देशी बनवण्यासाठी स्वतःच बायो बबल सुरक्षा, हॉस्पिटल वेंडर आणि टेस्टिंग लॅबची याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2) अनेक शहरांमध्ये सामना खेळण्यासाठी हवाई प्रवास करणे ही सर्वात मोठी समस्या होती. साहा, बालाजी आणि मिश्रा हे मुंबईहून दिल्लीला आले असता विमानतळावर पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळाली आहे. सर्व संघांनी राज्य सरकारकडे खासगी एक्सेस ट्रॅक (Termac) मागितला होता, तो नाकारला गेला आणि यामुळे कोविडचा धोका वाढला. युएईमध्ये खेळल्या जाणार्या सामन्या दरम्यान हवाई प्रवासाचा समावेश नव्हता.
3) प्रत्येक वेळी खेळाडूंनी परिधान केलेली ट्रॅकिंग डिव्हाइस (FOB) खराब असल्याचे दिसून आले. हे डिव्हाइस चेन्नईस्थित कंपनीकडून खरेदी करण्यात आले होते. मात्र, हे डिव्हाइस खेळांडूना ट्रॅक करू शकले नाही. त्यामुळे ही साधने कोठून व कशी खरेदी करावीत याचा विचार बीसीसीआयला करावा लागणार आहे.
4) बायो बबलच्या बाहेरील सदस्यांसाठी टेस्टिंग आणि अलग ठेवण्याचे प्रोटोकॉल मागील वेळेसारखे तितकेसे चांगले नव्हते, जे स्पर्धा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. ग्राउंड्समन, हॉटेल स्टाफ, ग्राउंड केटरिंग, नेट बॅलर, डीजे, ड्रायव्हर टेस्टिंग प्रक्रिया मागील वेळेइतकी कडेकोट नव्हती. या व्यतिरिक्त बर्याच शहरांमध्ये सामन्यांमुळे लोकांचे अनेक ग्रुप प्रत्येक वेळी बदलत असत. यावेळी बायो बबल, चाचणी प्रक्रियेमध्ये बर्याच त्रुटी आढळल्या. मात्र, युएईमध्ये या गोष्टी बर्यापैकी चांगल्या होत्या.
5) अनेक शहरांमध्ये, ज्या हॉटेलमध्ये टीम राहिली होती, तेथे संपूर्ण हॉटेल संपूर्ण स्पर्धेसाठी राखीव होते. तर काही शहरांमध्ये हॉटेलच्या काही खोल्या इतर अतिथींना देण्यात आल्या.
6) प्रत्येक फ्रेंचायझीने सेंट्रल प्रोटोकॉलऐवजी सदस्य आणि कर्मचार्यांसाठी स्वतंत्र बायो बबल तयार केला.
7) आयपीएल परदेशात आयोजित करण्यासाठी संघ फ्रँचायझी आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने स्पष्ट विनंती केली होती, पण बीसीसीआयने हा निर्णय भारतात ठेवण्याचा निर्णय घेतला.