IPL 2021 Captains List: आयपीएलच्या आठ संघांचे कर्णधार कोण? कुणाला किती अनुभव? वाचा सविस्तर...
यंदाच्या हंगामात केवळ दोन संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरतील, तर डेव्हिड वॉर्नर आणि इयॉन मॉर्गन हे दोन कर्णधार परदेशी असतील.
IPL 2021 Captains List: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. यापूर्वी, आयपीएलच्या आठ संघांचे कर्णधार कोण आहेत आणि कोणत्या कर्णधाराला आयपीएलचा किती अनुभव आहे हे जाणून घ्यायला हवं. त्यामुळे क्रिकेट फॅन म्हणून कोणत्या कर्णधाराने किती सामने जिंकलेत त्याची कर्णधार म्हणून कारकिर्द कशी राहिली आहे, याचा अंदाज बांधता येईल.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दोन संघांचे कर्णधार बदलण्यात आले आहेत. तर सहा संघांच्या कर्णधारांनी मागील मोसमातही संघाचं नेतृत्व केलं होतं. राजस्थान रॉयल्सने या मोसमात संजू सॅमसनला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथने संघांचं नेतृत्व केलं होतं. मात्र यावर्षी त्याला संघाने रिलीज केलं आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
ऋषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा
दिल्ली कॅपिटल्सने युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. ऋषभ आयपीएलमध्ये पहिल्यांदा कर्णधार म्हणून दिसणार आहे. दुसरीकडे, कोलकाता नाइट रायडर्सने आपला जुना कर्णधार इयॉन मॉर्गनवर पुन्हा विश्वास दाखवला आहे, मॉर्गनने 2020 च्या अर्ध्या मोसमानंतर संघाचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. त्याचबरोबर, एमएस धोनी नेहमीप्रमाणे चेन्नई सुपर किंग्ज अर्थात सीएसकेचा कर्णधार असणार आहे. तर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल असेल. मागीलल हंगामातही केएल राहुलने पंजाबचं नेतृत्व केलं होतं.
IPL 2021 Schedule : आयपीएलच्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...
मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करेल. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद पुन्हा डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात खेळेल. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणजेच आरसीबी पुन्हा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळेल. अशा प्रकारे आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केवळ दोन संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरतील, तर डेव्हिड वॉर्नर आणि इयॉन मॉर्गन हे दोन कर्णधार परदेशी असतील.
कोणत्या कर्णधाराला किती अनुभव ?
महेंद्रसिंह धोनी
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीने 177 सामन्यात संघांचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी धोनीने 105 सामने जिंकले आहेत, तर 71 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित आहे.
विराट कोहली
दुसर्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने आरसीबीकडून 112 सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. त्यापैकी 50 सामन्यात विजय मिळवला तर 56 सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. दोन 2 सामने बरोबरीत आहेत आणि 4 सामने अनिर्णीत आहेत.
रोहित शर्मा
रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणावा लागेल. तिसर्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने 106 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 61 सामने संघाने जिंकले आहेत, तर 43 सामने संघाने गमावले आहेत. दोन सामने टाय झाले आहेत.
डेवि़ड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरकडे 63 सामन्यामध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्यापैकी 34 सामने संघाने जिंकले आहेत आणि 28 सामने गमावले आहेत. तर एक सामना टाय झाला.
केएल राहुल
पाचव्या क्रमांकावर केएल राहुल आहे. केएल राहलने पंजाबचं नेतृत्व करताना 14 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि सात सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना टाय देखील झाला आहे.
इयॉन मॉर्गन
इयॉन मॉर्गन मॉर्गन सहाव्या क्रमांकावर असून तो केकेआरचा सात सामने कर्णधार राहिला आहे. त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत. तर एक सामना टाय झाला आहे.
संजू सॅमसन आणि ऋषभ पंतला कर्णधारपदाचा अनुभव नाही
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत हे दोघे एकाही सामन्याचा कर्णधार राहिले नाहीत. या मोसमात ते पहिल्यांदा त्यांच्या संघांचं नेतृत्व करणार आहे. आयपीएलच्या विजेतेपदाविषयी बोलायचं तर या यादीमध्ये रोहित शर्मा टॉपवर आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं आहे. चेन्नईने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात तीन वेळा आणि डेविड वॉर्नरच्या नेृतृत्वात हैदराबादने एकदा विजेतेदावर नाव कोरलं आहे.