पोरेल-मॅकगर्कनं राजस्थानची गोलंदाजी फोडली, दिल्लीची 221 धावांपर्यंत मजल
DC vs RR Score Live Updates : जेक मॅकगर्क आणि अभिषेक पोरेलचं वादळी अर्धशतक आणि स्ट्रिस्टन स्टबच्या फिनिशिंग टचच्या जोरावर दिल्लीने 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 221 धावांचा डोंगर उभारला.
DC vs RR Score Live Updates: जेक मॅकगर्क आणि अभिषेक पोरेलचं वादळी अर्धशतक आणि स्ट्रिस्टन स्टबच्या फिनिशिंग टचच्या जोरावर दिल्लीने 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 221 धावांचा डोंगर उभारला. जेक मॅकगर्क यानं 20 चेंडूत 50 , पोरेल यानं 36 चेंडूत 65 आणि स्टब्सने 20 चेंडूत 41 धावांचा पाऊस पाडला. राजस्थानकडून अश्विन यानं भेदक मारा करत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. राजस्थानला विजयासाठी 222 धावांचं आव्हान मिळाले आहे.
दिल्लीची वादळी सुरुवात, मॅकगर्कनं धावांचा पाऊस पाडला -
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण दिल्लीच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात करत हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं. दिल्लीकडून जेक मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी वादळी फलंदाजी केली. या दोघांच्या जोडीपुढे राजस्थानची फलंदाजी फिकी वाटली. विशेषकरुन मॅकगर्क यानं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यानं अवघ्या 20 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. अभिषेक पोरेल यानं सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. पण मॅकगर्क बाद झाल्यानंतर त्यानं राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
पोरेलचं वादळी अर्धशतक -
मॅकगर्क बाद झाल्यानंतर शाय होप दुर्देवी धावबाद झाला. त्यामुळे दिल्लीला एकापाठोपाठ एक दोन धक्के बसले. पण दुसऱ्या बाजूला असणाऱ्या अभिषेक पोरेल यानं वादळी फलंदाजी केली. त्यानं दिल्लीची धावसंख्या वाढवण्याचं काम केले. अभिषेक पोरेल यानं 36 चेंडूमध्ये 65 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्यानं सात चौकार आणि तीन खणखणीत षटकार ठोकले.
मध्यक्रम ढेपाळली -
चांगली सुरुवात झाल्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी लागोपाठ विकेट फेकल्या. ट्रिस्टन स्टब्सचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. शाय होप फक्त एक धाव काढून बाद झाला. तर अक्षर पटेल आणि ऋषभ पंत प्रत्येकी 15 धावा काढून बाद झाले. अक्षर पटेल यानं एक चौकार आणि एक षटकार लगावला. तर ऋषभ पंत यानं एक षटकार ठोकला. लागोपाठ तीन विकेट पडल्यानंतर स्टब्स आणि नईब यांनी दिल्लीचा डाव सावरला.
स्टब्सचा फिनिशिंग टच -
नईब आणि स्टब्स यांनी अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. गुलबदीन नईब यानं 15 चेंडूत 19 धावांची खेळी केली. यामध्ये एक चौकार आमि एक षटकार ठोकला. नईब आणि स्टिस्टब स्टब्स यांनी 29 चेंडूमध्ये 45 धावांची भागिदारी केली. स्टब्स यानं अखेरच्या काही षटकात तुफान फटकेबाजी केली. स्टब्सच्या शानदार खेळीच्या बळावरच दिल्लीने 200 धावांचा पल्ला पार केला. स्टब्सने 19 चेंडूमध्ये 41 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. कुलदीप यादव यानं दोन चेंडूमध्ये पाच धावा केल्या, त्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. रसिख सलाम यान तीन चेंडूमध्ये दोन चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्या.
राजस्थानची गोलंदाजी कशी राहिली ?
राजस्थानकडून आर. अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विन यानं चार षटकात 24 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. अश्विनने धोकादायक मॅकगर्क, अभिषेक पोरेल आणि अक्षर पटेल यांना तंबूत पाठवले. तर ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल आणि संदीप शर्मा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रियान पराग, आवेश खान यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.