DC vs SRH : पूरनची विस्फोटक खेळी व्यर्थ, दिल्लीचा हैदराबादवर 21 धावांनी विजय
DC vs SRH, IPL 2022 Marathi News : डेविड वॉर्नर, रॉवमन पॉवेल यांची विस्फोटक खेळी, त्याला खलील अहमदचा भेदक माऱ्याची साथ... या बळावर दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला.
DC vs SRH, IPL 2022 : डेविड वॉर्नर, रॉवमन पॉवेल यांची विस्फोटक खेळी, त्याला खलील अहमदचा भेदक माऱ्याची साथ... या बळावर दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला 186 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादच्या निकोलस पूरनची विस्फोटक खेळी व्यर्थ गेली. पूरन 62 धावा काढून बाद झाला. हैदराबादचा हा सलग सहावा पराभव होता. दिल्लीने या विजयासह आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवलेय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.
207 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन स्वस्तात माघारी परतले. खलील अहमदने अभिषेक शर्माचा तर नॉर्त्जेने विल्यमसनचा अडथळा दूर केला. अभिषेख शर्मा सात तर विल्यमसन चार धावा काढून बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांनी हैदाराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राहुल त्रिपाठीला मिचेल मार्शने 22 धावांवर तंबूत धाडलं. राहुल त्रिपाठीनंतर आलेला शशांक सिंहलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. शशांक फक्त दहा धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला सीन एबॉटही आठ धावांत तंबूत परतला. एका बाजूला विकेट पडत असताना निकोलस पूरन याने फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. निकोलस पूरन सामना फिरवेल असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने विकेट घेतली. शार्दूल ठाकूरने निकोलस पूरनला 62 धावांवर बाद केले. निकोलस पूरनने 34 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पूरनने सहा षटकार आणि दोन चौकार लगावले.
दिल्लीकडून खलील अहमद याने भेदक मारा केला. खलील अहमदने चार षटकात 30 धावा खर्च करताना तीन विकेट घेतल्या. खलीलला शार्दुल ठाकूर आणि इतर गोलंदाजांनी चांगली साथ दिली. शार्दुल ठाकूरने दोन तर नॉर्त्जे, मिचेल माऱ्श आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
दरम्यान, डेविड वॉर्नर आणि रॉवमन पॉवेल यांच्या वादळी खेळीच्या बळावर दिल्लीने निर्धारित 20 षटकात तीन बाद 207 धावांचा डोंगर उभा केला. वॉर्नरने 921 तर पॉवेलने 67 धावांची खेळी केली. आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 50 व्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात मनदीप सिंहला बाद करत हैदराबादला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर सीन एबॉटने मिचेल मार्शचा अडथळा दूर केला... मनदीप शून्य तर मिचेल मार्श 10 धावा काढून बाद झाले. दिल्लीच्या दोन विकेट झटपट गेल्या. पण त्यानंतर विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याने हल्लाबोल केला. वॉर्नरने पंतसोबत हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. वॉर्नरने पंतसोबत 29 चेंडूत 48 धावांची भागिदारी केली. कर्णधार ऋषभ पंत 26 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान पंतने 3 षटकार चोपले. पंत बाद झाल्यानंतर वॉर्नर आणि रॉवमन पॉवेल यांनी विस्फोटक फंलदाजी केली. या दोघांनी हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 66 चेंडूत 122 धावा जोडल्या. वॉर्नरने नाबाद 92 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान वॉर्नरने तीन षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडला. रॉवमन पॉवेलने 35 चेंडूत 67 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान पॉवेलने सहा षटकार आणि तीन चौकार लगावले. श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार आणि सीन एबॉट यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळीला. कार्तिक त्यागी, उमरान मलिक यांची पाटी कोरी राहिली.
उमरान-सीन पडले महाग
हैदराबादच्या गोलंदाजांना आज खास कामगिरी करता आली नाही. भुवनेश्वर, गोपाल आणि सीन एबॉट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पण एबॉट आणि उमरान यांना दिल्लीकरांनी धू धू धुतले. उमरानला 4 षटकात तब्बल 52 तर एबॉटला 4 षटकात 47 धावा ठोकल्या.