MS Dhoni: मार्शच्या चेंडूवर षटकार मारून धोनीनं रचला इतिहास, कोहलीच्या 'या' खास विक्रमाशी केली बरोबरी
MS Dhoni: दिल्लीविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 8 चेंडूत 21 धावांची आक्रमक खेळी केली आहे.
MS Dhoni: दिल्लीविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 8 चेंडूत 21 धावांची आक्रमक खेळी केली आहे. या कामगिरीसह महेंद्रसिंह धोनीनं विराट कोहलीच्या खास विक्रमाशी बरोबरी केली आहे. दिल्लीविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी आलेल्या धोनीला कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमधील 6000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ चार धावांची गरज होती. या सामन्यात धोनीनं पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला खेळाडू आहे.
विराट कोहलीनंतर 6000 हजार धावांचा टप्पा गाठणारा धोनी दुसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीनं आतापर्यंत एकूण 190 टी-20 क्रिकेट सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्यानं 6 हजार 451 धावा केल्या आहेत. ज्यात 48 अर्धशतक आणि पाच शतकांचा समावेश आहे. विराट कोहलीनं भारतीय क्रिकेट संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळली आहे. मात्र, टी-20 विश्वचषकानंतर त्यानं भारताच्या टी-20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडलं. तर, यंदाच्या हंगामात फाफ डू प्लेसिस आरसीबीच्या संघाचं नेतृत्व करत आहे.
दिल्लीविरुद्ध सामन्यात धोनी आठराव्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आला. या सामन्यात त्यानं आठ चेंडूचा सामना करत नाबाद 21 धावा केल्या. यंदाच्या हंगामात धोनीनं चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीनं रवींद्र जडेजाकडं चेन्नईचं कर्णधारपद सोपवलं होतं. ज्यामुळं महेंद्रसिंह धोनी विराटच्या पंक्तीत स्थान मिळवू शकणार नाही, असं वाटत होतं, त्यानंतर जडेजानं हंगामाच्या मध्यावर पुन्हा धोनीकडं कर्णधारपद सोपवलं आणि धोनीनं हा विक्रम आपल्या नावावर केला.
हे देखील वाचा-