प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
निवडणुकीतील प्रचारासाठी येथील वार्ड क्रमांक 157 मध्ये चक्का महिलांच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता.

मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असून प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. डिजिटल यंत्रणाही राबवली जात असून सेलिब्रिटी व मोठी नेतेमंडंळीही प्रचाराच्या मैदानात उतरवली जात आहे. मात्र, भाजप उमेदवाराने आपल्या प्रचाराचा वेगळाच फंडा निवडला आहे. मुंबईतील (Mumbai) वार्ड 157 मध्ये भाजप (BJP) उमेदवार आशाताई तायडे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, या ब्लँकेट वाटपाच्या कार्यक्रमात महिला नाचविण्याचाही कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे, इथे काळ्या साडीत नाचणारी महिला चक्क महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर नाचताना दिसत आहेत. त्यावरुन, आता विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
निवडणुकीतील प्रचारासाठी येथील वार्ड क्रमांक 157 मध्ये चक्का महिलांच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावरुन, शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते अखिल चित्रे यांनी ट्विटरवरुन संताप व्यक्त केला आहे. ''हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना भाजपाच्या महाभागांना ह्याचंही भान नाही की, मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत. आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?'' अशा शब्दात शिवसेना नेते अखिल चित्रे यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी भाजप मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनाही मेन्शन केलं आहे.
बरं, ह्या कार्यक्रमाच्या आयोजक कोण? तर भाजपाच्या स्थानिक उमेदवार, संयोजक कोण तर सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपाने कोषाध्यक्ष नेमलेला पवन त्रिपाठी. ही असली माणसं आमच्या पवित्र मंदिरावर नेमताना लाज कशी वाटली नाही भाजपाला? असा सवालही अखिल चित्रे यांनी उपस्थित केलाय. तसेच, मुंबईकरांनो आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही, ह्यांच्या डोक्यात चढलेली सत्तेची मस्ती उतरविण्याची संधी वारंवार येत नसते, ह्यांना एकदाचा शिवटोला देऊयाच असेही चित्रे यांनी म्हटलं आहे.
हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना @BJP4Mumbai @AmeetSatam @ShelarAshish भाजपाच्या महाभागांना ह्याचंही भान नाही कि मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव… pic.twitter.com/tYGnHkAqUM
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 5, 2026
दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून आणि भाजप शिवसेना युतीचे त्यांच्यापुढे आव्हान आहे. मात्र, दोन भाऊ एकत्र आल्याने ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, यंदाची मुंबई महापालिका निवडणूकही अटीतटीची बनली आहे.
हेही वाचा
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका




















