मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
संतोष धुरी यांच्यानंतर मनसेला आणखी एक धक्का बसला असून प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश आणि या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असून राजकीय नेतेही रणनीती आखत हे पक्षप्रवेश घडवून आणत आहेत. महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना युतीचे जवळपास 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, महायुतीच विश्वास दुणावला असून अद्यापही इतर पक्षातील स्थानिक नेते आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच सुरू असल्याचे दिसून येते. माजी नगरसेवक तथा मनसेचे (MNS) सरचिटणीस राहिलेल्या संतोष धुरी यांनी मनसेला बाय करत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, शिंदेंच्या शिवसेनेतही (Shivsena) महत्त्वाचे प्रवेश झाले आहेत. त्यामध्ये, मनसेच्या दोन पदाधिकारी आणि नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात (BJP) गेलेल्या एका माजी आमदाराने शिवसेनेत प्रवेश केला.
संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला, त्यानंतर बोलताना त्यांनी राज ठाकरेंनी आपला पक्षच शिवसेनेच्या स्वाधीन केल्याची टीकाही केली. धुरी यांच्या प्रवेशानंतर काही वेळातच मनसेला आणखी एक धक्का बसला असून प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर, माजी आमदार नितीन भोसले यांनीही एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. विशेष म्हणजे, नितीन भोसले यांनी 10 दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र, आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी आमदार नितीन भोसले यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. नितीन भोसले यांनी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, 25 डिसेंबर रोजी हा भाजप पक्षप्रवेश झाला होता. मात्र, भाजपने नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीयांना संधी न दिल्याने त्यांनी भाजपला सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 13 मधून नितीन भोसले यांच्या भावजयी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र, भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने भोसलेंनी 10 दिवसातच भाजपला सोडून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेस नेते शाहू खैरे यांचाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला.
दरम्यान, आमदार नितीन भोसले यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यलयात राडा झाला होता. मंत्री गिरीश महाजन यांनाही भाजप समर्थकांकडून घेराव घालण्यात आला होता. आज त्याच नितीन भोसले यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल




















