IND vs ENG Day 1 Stumps: पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला; रोहित शर्माचं दमदार अर्धशतक
IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात मोटेरा येथे खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फक्त 112 धावांवर कोसळला. त्यांच्यासाठी सलामीवीर जॅक क्रोलीने सर्वाधिक 53 धावा केल्या.
IND vs ENG 3rd Test Day 1: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसर्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात केवळ 112 धावांवर इंग्लंडला गुंडाळून गोलंदाजीनंतर टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गडी गमावून 99 धावा केल्या. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मा 57 आणि अजिंक्य रहाणे एका धावांवर नाबाद परतला.
तत्पूर्वी, इंग्लंडच्या 112 धावांच्या उत्तरात भारताचीही पहिल्या डावात चांगली सुरुवात झाली नाही. 33 धावसंख्येवर शुभमन गिल अवघ्या 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले. यानंतर भारतीय संघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज चेतेश्वर पुजारा खाते न उघडताच बाहेर गेला. जॅक लीचने त्याची शिकार केली.
34 धावांत दोन बळी पडल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मासमवेत आघाडी घेतली. दोघांनी तिसर्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. दरम्यान, रोहितने केवळ 63 चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने कसोटी क्रिकेटमधील आपले 12 वे अर्धशतक पूर्ण केले.
कोहलीने 58 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. जॅक लीचने त्यालाही बाद केले. भारताने तिसरा गडी 98 धावांच्या स्कोरवर गमावला. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रोहितने एक बाजू लावून धरली. तो 82 चेंडूत 9 चौकारांसह 57 धावांवर खेळत आहे.
त्याचवेळी इंग्लंडकडून जॅक लीचने 27 धावांत 2 आणि जोफ्रा आर्चरने 24 धावा देऊन एक बळी घेतला. मात्र, जेम्स अँडरसननेही शानदार गोलंदाजी केली. त्याने 9 षटकांत एका मिडेन ओव्हरसह केवळ 11 धावा दिल्या. पण त्याला यश मिळालं नाही.
अक्षर पटेलची घातक गोलंदाजी इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात अक्षर पटेलच्या घातक गोलंदाजीपुढे अक्षरशः नांग्या टेकल्या. अक्षरने जॅक क्रोली (53), जॉनी बेअरस्टो (00), बेन स्टोक्स (06), बोन फॉक्स (12), जोफ्रा आर्चर (11) आणि स्टुअर्ट ब्रॉड (03) यांना तंबूचा रस्ता दाखवला.
भारतासाठी डे-नाईट टेस्टच्या डावात पाच बळी घेणारा अक्षर पटेल पहिला स्पिनर ठरला. यासह, तो पिंक बॉलने डे-नाईट टेस्टच्या डावात सर्वाधिक विकेट घेणारा जगातील दुसरा स्पिनरही ठरला आहे.
इंग्लंड 112 धावांवर सर्वबाद इंग्लंडच्या डावात जॅक क्रोलेने 84 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 53 धावा केल्या. त्याच्याशिवाय रूटने 17, विकेटकीपर फलंदाज बेन फॉक्सने 12 आणि जोफ्रा आर्चरने 11 धावा केल्या. भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे सात फलंदाज दहाच्या आकड्यालाही स्पर्श करु शकले नाहीत.