ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी क्विक-कॉमर्स कंपन्यांना डिलिव्हरीसाठी अवास्तव वेळेची मर्यादा ठेवू नये, अशी सूचना दिली होती. हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही चर्चेला आला होता.

देशातील आघाडीची क्विक-कॉमर्स कंपनी ब्लिंकिट (Blinkit) ने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’ करण्याचा दावा काढून टाकला आहे. यासोबतच कंपनीने आपले घोषवाक्यही बदलले असून, आधी असलेले “10 मिनिटांत 10,000+ उत्पादने” हे आता बदलून “30,000+ उत्पादने तुमच्या दारापर्यंत” असे करण्यात आले आहे. हा बदल केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी क्विक-कॉमर्स कंपन्यांना डिलिव्हरीसाठी अवास्तव वेळेची मर्यादा ठेवू नये, अशी सूचना दिली होती. सरकारच्या मते, 10 मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या दबावामुळे डिलिव्हरी करणाऱ्या गिग वर्कर्सच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होत आहे.
क्विक-कॉमर्स उद्योगातील कामकाज पद्धतींवर चर्चा
सरकारने व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, इतक्या कमी वेळेत ऑर्डर पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉय अनेकदा वेगात वाहन चालवतात, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अपघात, शारीरिक थकवा आणि मानसिक ताण वाढत असल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर 2025 च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशभरातील गिग वर्कर्सनी संप केला होता. या संपातून कामगारांनी आपली सुरक्षितता, कामाचे तास, आणि उत्पन्नाशी संबंधित प्रश्न उघडपणे मांडले होते. यामुळे क्विक-कॉमर्स उद्योगातील कामकाज पद्धतींवर देशभरात चर्चा सुरू झाली.
खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत मुद्दा मांडला
हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही चर्चेला आला होता. खासदार राघव चड्ढा यांनी डिलिव्हरी कामगारांना भोगावे लागणारे धोके, त्यांच्यावर असलेला वेळेचा ताण आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव यावर संसदेत लक्ष वेधले होते. त्यांनी या कामगारांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण आणि सामाजिक संरक्षणाची मागणी केली होती. ब्लिंकिटच्या या निर्णयानंतर स्विगी (Swiggy) आणि झेप्टो (Zepto) यांसारख्या इतर क्विक-कॉमर्स कंपन्यांवरही अशाच प्रकारे 10 मिनिटांच्या डिलिव्हरीच्या दाव्यांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























