IND vs SL, ICC Women's T20 WC | टीम इंडियाचा सलग चौथा विजय, श्रीलंकेचा सात विकेट्सने धुव्वा
महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने सलग चौथा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.
पर्थ : ऑस्ट्रेलियातल्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतानं श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतीय महिलांचा हा सलग चौथा विजय ठरला. या सामन्यात राधा यादवनं चार, तर राजेश्वरी गायकवाडनं दोन विकेट्स काढून श्रीलंकेला नऊ बाद 113 धावांत रोखलं. त्यानंतर भारतानं तीन विकेट्स गमावून विजयासाठीचं लक्ष्य पंधराव्या षटकात गाठलं.
महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतानं श्रीलंकेवर मिळवलेल्या विजयावर सलामीच्या शेफाली वर्मानं ठसा उमटवला. तिनं 34 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह 47 धावांची खेळी उभारली. भारताच्या ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडवरच्या विजयातही शेफाली वर्माचा मोलाचा वाटा होता. तिनं अनुक्रमे 29, 39 आणि 46 धावांची खेळी केली होती.
श्रीलंकेकडून कर्णधार चमारी अटापटू 33 आणि दिलहारी 25 धावा केल्या. दोघींच्या या खेळीमुळे श्रीलंकेने 20 षटकात टीम इंडियाला 114 धावांचं लक्ष्य दिलं. भारताकडून राधा यादवने 4, राजेश्वरी गायकवाडने 2 आणि दिप्ती शर्मा, शिखा पांडे, पूनम यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्माच्या 47 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने हे लक्ष्य सहज पार केलं. टीम इंडिया विश्वचषकातील साखळी फेरीतील चारही सामने जिंकत अ गटात टॉपवर आहे. संबंधित बातम्याIND vs AUS, Women's T20 WC | T-20 विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी
भारतीय महिलांची विजयी घोडदौड, शेफाली वर्मा-पूनम यादवची निर्णायक कामगिरी
Women's T20 World Cup | भारतीय संघाची विजयी हॅट्रीक; सेमीफायनमध्ये एन्ट्री