(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय महिलांची विजयी घोडदौड, शेफाली वर्मा-पूनम यादवची निर्णायक कामगिरी
भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियातल्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला.
पर्थ : हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघानं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात ऑस्ट्रेलियापाठोपाठ बांगलादेशलाही धूळ चारली. अ गटातल्या आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारतानं बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला. भारताचा विश्वचषकातला हा सलग दुसरा विजय ठरला.
शेफाली वर्माची वेगवान सुरुवात
या सामन्यात भारतानं शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या दमदार खेळीमुळे 20 षटकांत 142 धावा उभारल्या होत्या. शेफालीनं भारताला दणदणीत सुरुवात करुन देताना अवघ्या 17 चेंडूत 39 धावा फटकावल्या. तिच्या या खेळीत दोन चौकार आणि तब्बल चार षटकारांचा समावेश होता. सलामीवीर स्मृती मानधना तापानं आजारी असल्यामुळे तिच्या जागी तानिया भाटियाला सलामीला धाडण्यात आलं होतं. पण अवघ्या 2 धावा काढून ती बाद झाली. त्यानंतर आलेल्या मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्सनं शेफालीच्या साथीनं भारताच्या डावाला आकार दिला. जेमिमानं 37 चेंडूत 34 धावांची जबाबदार खेळी केली.
भारतीय आक्रमण पुन्हा प्रभावी
143 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्य़ा बांगलादेशनं चांगली सुरुवात केली होती. 10 षटकांत 2 बाद 60 अशा चांगल्या स्थितीत असलेल्या बांगलादेशला पुन्हा एकदा लेग स्पिनर पूनम यादवनं आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर ठराविक अंतरानं बांगलादेशची फलंदाजी ढेपाळत गेली. त्यामुळे बांगलादेशला 20 षटकांत आठ बाद 124 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून यष्टिरक्षक फलंदाज निगार सुलतानानं सर्वाधिक 35 धावांची खेळी उभारली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मोलाचं योगदान दिलेल्या पूनम यादवनं या सामन्यातही कमाल केली. तिनं चार षटकांत 14 धावा मोजताना बांगलादेशच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डीनं दोन-दोन विकेट्स घेतल्या.
पुढचं आव्हान न्यूझीलंडचं...
साखळी फेरीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा सामना आता न्यूझीलंडशी होणार आहे. येत्या गुरुवारी मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. अ गटातून उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टिनं भारताला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. या सामन्यासाठी स्मृती मानधना संघात परतणार असली तरी कर्णधार हरमनप्रीत कौरचा खराब फॉर्म ही भारताच्या दृष्टिनं चिंतेची बाब ठरावी.