World cup 2019 | ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर 8 विकेट्सनी मात, वॉर्नरची 88 धावांची महत्त्वपूर्ण खेळी
जवळपास दीड वर्ष वन-डे क्रिकेटपासून दूर असलेल्या डेव्हिड वॉर्नरनं विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात झोकात पुनरागमन केलं. वॉर्नरनं अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 88 धावांची खेळी साकारुन ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
लंडन : पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानवर आठ विकेट्सनी मात करुन विश्वचषक मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियासमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कर्णधार अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरनं ऑस्ट्रेलियाला हे आव्हान 35 व्या षटकातच गाठून दिलं.
फिंचनं 49 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह 66 धावा कुटल्या. त्यानं वॉर्नरसह सलामीच्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी रचून कांगारुंच्या विजयाचा पाया घातला. तर वॉर्नरनं 114 चेंडूत नाबाद 88 धावांची जबाबदार खेळी साकारली.
त्याआधी अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 208 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रभावी माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा डाव 39 व्या षटकात 207 धावांत आटोपला. अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर शून्यावर माघारी परतले. त्यामळे त्यांची दोन बाद 5 अशी केविलवाणी अवस्था होती. त्या परिस्थितीत रेहमत शाह आणि नजीबउल्लाह झादरानच्या फलंदाजीमुळे अफगाणिस्तानला दोनशेचा टप्पा गाठता आला. रेहमत शाहनं 43 तर झादराननं 51 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पा आणि पॅट कमिन्सनं प्रत्येकी तीन तर मार्कस स्टॉयनिसनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
डेव्हिड वॉर्नरचं पुनरागमन
जवळपास दीड वर्ष वन-डे क्रिकेटपासून दूर असलेल्या डेव्हिड वॉर्नरनं विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात झोकात पुनरागमन केलं. वॉर्नरनं अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 88 धावांची खेळी साकारुन ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. वॉर्नरची ही खेळी अनेक अर्थानं महत्वाची ठरली. कारण वॉर्नरनं आपला अखेरचा वन डे सामना 28 जानेवारी 2018 साली खेळला होता.
गेल्या वर्षी केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे गेले 17 महिने तो वन डे क्रिकेटपासून दूर होता. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या खेळीनं आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालो असल्याचं वॉर्नरनं दाखवून दिलं.