(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC U19 World Cup 2022: यंग टीम इंडियानं रचला इतिहास! महाराष्ट्रातील 'या' खेळाडूंचं विजयात मोलाचं योगदान
ICC U19 World Cup 2022: यश धुलच्या युवा टीम इंडियानं अंडर नाईन्टिन विश्वचषकावर चार वर्षांनी पुन्हा भारताचं नाव कोरलं. महाराष्ट्रातील तीन खेळाडूंनी देखील आपलं विशेष योगदान दिलं आहे.
ICC U19 World Cup 2022: यश धुलच्या युवा टीम इंडियानं अंडर नाईन्टिन विश्वचषकावर चार वर्षांनी पुन्हा भारताचं नाव कोरलं. अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या इतिहासात भारतानं पाचव्यांदा विजेतेपदाचा मान मिळवला. अँटिगात झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा चार विकेट्सनी पराभव केला. भारतानं विजयासाठीचं 190 धावांचं आव्हान 14 चेंडू आणि चार विकेट्स राखून पार केलं. टीम इंडियानं हा विजय मिळवत इतिहास रचला. हा इतिहास रचत असताना सर्वच खेळाडूंची कामगिरी चांगली केली. यात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंनी देखील आपलं विशेष योगदान दिलं आहे.
उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीची जोरदार चर्चा
राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीची विश्वचषकात जोरदार चर्चा झाली. भारतीय संघातील सहा खेळाडू ऐनवेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतरदेखील भारतानं आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्ध मोठे विजय मिळवलेत. या विजयात मूळचा उस्मानाबादचा असलेल्या राजवर्धन हंगरगेकरचा मोलाचा वाटा आहे. अंडर-19 वर्ल्डकपमधील राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्यानं केवळ गोलंदाजीनंच नव्हेतर, फलंदाजीनंही प्रेक्षकांना आकर्षित केलं. अंडर-19 वर्ल्डकपमध्ये आयर्लंड विरुद्ध 45 व्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या राजवर्धननं तुफानी खेळी केली होती. त्यानं केवळ 17 चेंडूंमध्ये नाबाद 39 धावा तडकवल्या होत्या. यात एक चौकार आणि पाच षटकार त्यानं ठोकले. त्यानं अखेरच्या षटकात सलग 3 षटकार ठोकून सर्वांच लक्ष वेधून घेतलं. राजवर्धनच्या फलंदाजीचा हा व्हिडिओ आयसीसीने देखील ट्विट केला.
खेळात सातत्य असल्यानं भारतीय संघात निवड
आयसीसीनं ट्वीट करत म्हटलं होतं की, राजवर्धन आष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या खेळात सातत्य असल्यानं त्याची भारतीय संघात निवड झाली. दु्र्देवाने राजवर्धनची क्रिकेटची आवड जोपासणारे वडिलांचं कोरोनामुळे निधन झालंय. पण ज्यांच्यामुळं त्यानं क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं, त्याचे वडील हे यश पाहायला हवे होते, अशी भावना त्याच्या राजवर्धनच्या आईनं एबीपी माझाशी बोलून दाखवली होती. युवराज सिंह, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, रिषभ पंत हे 19 वर्षे भारतीय संघातून खेळून पुढे स्टार झाले. खेळात सातत्य राहिले, फिटनेस राहिला तर तो भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे. तसे झालं तर हा उस्मानाबाद सारख्या छोट्या शहरातल्या गुणवत्तेची मोठी ओळख ठरेल.
पुण्याच्या विकी ओस्तवाल आणि कौशल तांबेचीही कमाल
भारतीय संघात असलेल्या पुण्याच्या विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे या युवा खेळाडूंनीही विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. विकी ओस्तवालं सहा सामन्यात 12 विकेट्स घेतल्या. तो विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्यानं एका सामन्यात पाच विकेट घेण्याची कामगिरीही केली. कौशलनं देखील आपल्या अष्टपैलू कामगिरीनं वाहवा मिळवली आहे.
प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस
या शानदार विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील संघाचं अभिनंदन केलं आहे. गांगुली यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शानदार पद्धतीने विश्वचषक जिंकल्याबद्दल 19 वर्षांखालील संघ आणि सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांचे अभिनंदन. आम्ही जाहीर केलेले 40 लाखांचे रोख पारितोषिकाचं कौतुक या खेळाडूंच्या कामगिरी आणि प्रयत्नापुढे तोकडं आहे, असं गांगुलींनी म्हटलं आहे.
हे देखील वाचा-
- IND Vs Sri: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका बंगळुरूमध्येच! बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडून स्पष्ट
- Yash Dhull: यश धुलची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी; क्रिकेटसाठी वडिलांनी सोडली नोकरी, पेन्शनवर उदरनिर्वाह चालायचा, आता गाजवतोय मैदान
- ICC U19 World Cup: यश धुलचा उत्तुंग षटकार! टॉम व्हिटनीच्या गोलंदाजीवर चेंडू पाठवला मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha