ICC Cricket World Cup 2019 | विश्वचषकात देशाच्या शूर जवानांकडून प्रेरणा मिळणार : विराट कोहली
विश्वचषकात खेळताना परिस्थितीनुसार संघात बदल केले जातील. त्याचबरोबर यंदाचा विश्वचषक त्याच्यासाठी सर्वात आव्हानात्मक असल्याचंही विराटनं सांगितलं.
मुंबई : आगामी विश्वचषकासाठी टीम इंडिया उद्या पहाटे इंग्लंडला रवाना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत टीम इंडियाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींनी विश्वचषकाच्या तयारीवर भाष्य़ केलं. याशिवाय विराटनं यंदाच्या विश्वचषकात देशाच्या शूर जवानांकडून प्रेरणा मिळणार असल्याचं सांगितलं.
काही दिवसांपूर्वी भारताचे माजी कसोटीपटू मोहिंदर अमरनाथ यांनी भारतीय संघाला विश्वचषकात देशाच्या शूर सैनिकांसाठी खेळा, असं विधान केलं होतं. त्यावर विराटनं सकारात्मक प्रतिसाद दिला.
विराटनं यंदाच्या विश्वचषकासाठीचा भारतीय संघ समतोल आहे. पण विश्वचषकात खेळताना परिस्थितीनुसार संघात बदल केले जातील. त्याचबरोबर यंदाचा विश्वचषक त्याच्यासाठी सर्वात आव्हानात्मक असल्याचंही विराटनं सांगितलं.
विराटच्या म्हणण्यानुसार आगामी विश्वचषकाचं स्वरुप सर्वात खडतर आणि आव्हानात्मक आहे. त्यामुळे कोणताही संघ या विश्वचषकात कुणावरही भारी पडू शकतो. प्रशिक्षक रवी शास्रींनीदेखील भारतीय संघ पूर्ण क्षमतेनिशी खेळल्यास आपण पुन्हा विश्वचषक जिंकू अशी खात्री दिली.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विराटनं विश्वचषक जिंकायचा असेल तर कोणत्याही एका संघावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. त्यासाठी आम्हाला पूर्ण परिस्थितीनुसार खेळावं लागेल असं विराट म्हणाला.
30 मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तर 5 जूनला भारताची सलामीची लढत इंग्लंडशी होणार आहे.