Hockey World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आता उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
India vs New Zeland Hockey World Cup 2023 : ओडिशामध्ये सुरु असलेल्या 15 व्या हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख खेळाडू हार्दिक सिंह (Hardik Singh Ruled Out) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ही बातमी न्यूझीलंडविरुद्धच्या क्रॉसओव्हर सामन्याच्या एक दिवस आधी आली आहे. हार्दिक सिंगच्या जागी राजकुमार पालचा संघात समावेश करण्यात आला आहे.
मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी दिलेल्या माहितीत ते म्हणाले, 'रविवारच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक सिंहच्या दुखापतीमुळे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला त्याची दुखापत फारशी गंभीर वाटत नव्हती, मात्र बराच विचारविनिमय केल्यानंतर हार्दिकच्या जागी राजकुमार पालचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. हार्दिक सिंह पहिल्या दोन सामन्यांमध्ये ज्याप्रकारे चमकदार कामगिरी करत होता ते लक्षात घेता, संघासाठी ही अत्यंत निराशाजनक बातमी आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान ही दुखापत झाली होती
15 जानेवारीला झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात हार्दिक सिंहला (Hardik Singh) दुखापत झाली होती. यानंतर त्याला वेल्सविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. सुरुवातीला त्याची दुखापत गंभीर नसल्याची अपेक्षा होती पण नंतर संघ व्यवस्थापनाला त्याच्या बदलीचा निर्णय घ्यावा लागला.
View this post on Instagram
कधी, कुठे भारत विरुद्ध न्यूझीलंड पाहाल सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड हा हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताचा क्रॉसओव्हर सामना रविवारी 22 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायकांळी 7 वाजता सामना खेळवला जाईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.
कसा आहे भारतीय संघ?
अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंह, जर्मनप्रीत सिंह, मनदीप सिंह, हरमनप्रीत सिंह (कर्णधार), राजकुमार पाल, ललित उपाध्याय, कृष्ण पाठक, निलम संजीप एक्सेस, पीआर श्रीजेश, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंह, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद आणि सुखजीत सिंग.
हे देखील वाचा