(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sports for Change : अंतिम सामने नागपुरात, दहा राज्यातील 650 खेळाडूंचा सहभाग
10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 650 खेळाडू Sports for Change मध्ये सहभागी झाले आहेत. 18 क्रीडा प्रकारांत अंतिम फेरी होत आहे. यात 6 टीम, 5 इंडोअर स्पोर्ट आणि 7 अॅथलॅटिक्स स्पर्धांचा समावेश आहे.
नागपूर : एचसीएल फाउंडेशनतर्फे तळागाळातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित दोनदिवसीय 'स्पोर्ट्स फॉर चेंज' क्रीडा महोत्सवाची सुरुवात आजपासून (गुरुवार) बजाजनगर येथील व्हीएनआयटी (VNIT Nagpur) झाली आहे. या महोत्सवात देशभरातील दहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 650 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. विविध 18 गटातील अंतिम फेरी होत आहे. यात 6 टीम स्पोर्ट, 5 इंडोअर स्पोर्ट आणि 7 अॅथलॅटिक्स स्पर्धांचा समावेश आहे.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत असलेल्या या महोत्सवाबद्दल सविस्तर माहिती देताना फाउंडेशनच्या संचालक निधी पुंडीर म्हणाल्या, शहरासह ग्रामीण भागांतही प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या व व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने 'स्पोर्ट्स फॉर चेंज' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून गोरगरीब खेळाडूंना वर्षभर तज्ज्ञांकडून प्रशिक्षण, क्रीडा साहित्याचा समावेश असलेली किट, पौष्टिक आहार व शिक्षण व करिअरसाठी मदत केली जाते. शारीरिकसोबतच मानसिक तंदुरुस्तीवर विशेष भर दिला जातो. याचा फायदा आतापर्यंत शेकडो युवा खेळाडूंना झाला असून, ते मुख्य प्रवाहात आल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे हे चौथे सिझन असून 2019ची स्पर्धा उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे झाली होती. मात्र कोव्हिडमुळे 2020 आणि 2021मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते.
देशभरातील विविध स्पर्धा व प्रशिक्षणातून तयार झालेल्या खेळाडूंची दोनदिवसीय अंतिम स्पर्धा नागपुरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या (HCL Technologies) अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा यांच्या हस्ते गुरुवारी झाले. समारंभाला अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू अनुप श्रीधर Anup Sridhar, पॅरालिम्पिकपटू जर्लिन अनिका Jerlin Anika, विजय आनंद गुंटूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जम्मू-काश्मीर, लदाख, नागालँड, तेलंगण, राजस्थान व अन्य राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडूंचा सहभाग असलेल्या या महोत्सवात फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, अॅथलेटिक्ससह एकूण 18 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. यादरम्यान दिव्यांग खेळाडूंचेही प्रदर्शनी सामने खेळले जाणार आहेत. फाउंडेशनतर्फे खेळाडूंचा (HCL Foundation) पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कर्मचाऱ्यांचेही पाठबळ
एचसीएलच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी फक्त सीएसआरमधूनच नव्हे तर कर्मचारी आपल्या पगारातूनही दर महिन्याला, वाढदिवसाला किंवा आपल्या मुलांच्या वाढदिवशी किंवा नव्याने कंपनीत रुजू होणारे अनेक कर्मचारी आपला पहिला पगार या सामाजिक उपक्रमासाठी देत असल्याचेही यावेळी फाउंडेशनच्या संचालक निधी पुंडीर यांनी सांगितले.