Fifa World Cup 2022 : स्लम सॉकरमधील स्टार फुटबॉलर शुभम पाटील कतारला, विजय बारसेंच्या शिष्याला फिफाचं आमंत्रण
Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरु होत असून कतारमध्ये यंदा पार पडणाऱ्या स्पर्धेसाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी कमालीचे उत्सुक दिसत आहेत.
Fifa World Cup 2022 : आजपासून फुटबॉलचा महाकुंभ म्हणजेच फिफा फुटबॉल विश्वचषक (Fifa World Cup 2022) सुरू होत आहे. जगातील या सर्वात मोठ्या क्रीडा आयोजनात फिफाने नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची आठवण आवर्जून ठेवली आहे. स्लम सॉकरच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलपटू बनवण्याचा काम गेले अनेक दशकं विजय यांनी केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटाच्या माध्यमातून विजय बारसे यांची कहाणी सर्वांनी पाहिलीच आहे. आता फिफा ने विजय बारसे यांच्या एका शिष्याला विश्वचषक पाहण्यासाठी थेट कतारला आमंत्रित केलं आहे.
स्लम सॉकरच्या माध्यमातून फुटबॉलपटू बनलेला शुभम पाटील हा तरुण विजय बारसे यांच्या स्लम सॉकर चा प्रतिनिधित्व करत फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला गेला आहे. ''जरी फुटबॉल विश्वचषकाचा आयोजन करणारा फिफा एक जगातील श्रीमंत संघटना असली, तरी फुटबॉल मुळात गरीबांचा खेळ आहे आणि फुटबॉलचा सर्वात मोठं आयोजन करताना फिफाने स्लम सॉकर खेळणाऱ्या गरीब मुलांची आठवण ठेवली आहे. हेच महत्त्वाचे आहे,'' असं मत विजय बारसे यांनी व्यक्त केलं आहे. शुभम पाटील अत्यंत गरीब घरातून आला असून फुटबॉलच्या माध्यमातून त्याने आपले जीवन नव्याने उभारले आहे. आता तो विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाणार असून ही त्याच्यासह सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
फिफा वर्ल्ड कपचं वेळापत्रक कसं?
ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल. या सर्व सामन्यांसाठी 5 वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.
कधी, कुठे पाहाल सामने?
हे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत. अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ 7-7 सामने खेळतील. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
हे देखील वाचा-