एक्स्प्लोर
पत्नीच्या सर्व आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर, EXCLUSIVE मुलाखत
या सर्व वादानंतरही सगळं काही ठीक होईल, अशी अपेक्षा मोहम्मद शमीने एबीपी न्यूजशी बोलताना व्यक्त केली. या वेळी तो आपल्या अडीच वर्षांच्या मुलीविषयी बोलताना भावूकही झाला.

नवी दिल्ली : एका शेतकरी कुटुंबातून टीम इंडियापर्यंत पोहोचलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या अडचणीत आहे. पत्नीने केलेल्या आरोपांनंतर तो एका अशा परिस्थितीला सामोरं जात आहे, ज्यातून तो संवादाने आणि गैरसमज दूर करुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व वादानंतरही सगळं काही ठीक होईल, अशी अपेक्षा मोहम्मद शमीने एबीपी न्यूजशी बोलताना व्यक्त केली. या वेळी तो आपल्या अडीच वर्षांच्या मुलीविषयी बोलताना भावूकही झाला. ''वाद एवढा वाढलाय, नात्यातलं अंतर एवढं वाढलंय, की काहीजण या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. हे आमचं खाजगी प्रकरण आहे. जो काही गैरसमज असेल, तो संवादाने सुटला पाहिजे. जी घरातली गोष्ट तुम्ही (हसीन जहा) बाहेर आणली आहे, त्याने लोकांचं हसू झालं आहे. वाद आणखी किती वाढेल आणि याची किती मजा घेता येईल, असा विचार लोक करत आहेत,'' असं आवाहन शमीने पत्नीला केलं. ''मी जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत हा वाद घरातच सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल. माझी मुलगी, पत्नी आणि कुटुंबांची अब्रू घरातच रहावी. मुलीच्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा वाद घरातच रहावा, अशी इच्छा आहे,'' असं शमी म्हणाला. ऑडिओ क्लीपवर शमी म्हणतो... ''ऑडिओ क्लीप असेल किंवा इतर काही, त्याची तपासणी केल्यानंतर लॅबमधून खरी माहिती समोर येईलच. हा मोठा मुद्दा नाही, मात्र माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वात मोठा प्रश्न आहे,'' असं स्पष्टीकरण शमीने कथित ऑडिओ क्लीपवर दिलं. पाकिस्तानी तरुणी आलिश्बाच्या मुद्द्यावरही शमीला प्रश्न विचारण्यात आला. मात्र ज्याने हा आरोप केलाय, त्याने तो सिद्ध करणं गरजेचं आहे, असं शमी म्हणाला. दरम्यान, आलिश्बाला ओळखण्यास शमीने थेट नकारही दिला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून भारतात परतताना दुबईला जाण्यावर शमीने उत्तर दिलं. ''प्रत्येक जण येताना दुबईहूनच भारतात परतला आहे. प्रत्येकाच्या विमानाची वेळ वेगवेगळी होती. त्यामुळे दुबईला जाणं मोठा मुद्दा नाही,'' असं शमी म्हणाला. दुबई व्हिसावरही शमीने स्पष्टीकरण दिलं. ''पत्नीने दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून परतताना पत्नीने 2 कॅरट डायमंड इयर रिंगची मागणी केली होती. मात्र 2 कॅरट डायमंड मिळणं शक्य नव्हतं. मला याबाबत काही माहितीही नव्हती. त्यानंतर तिने दुबईहून येताना दागिने आणायला सांगितले. तेव्हा मी तिला दुबईच्या व्हिसाला नकार दिला. त्यानंतर दुबईचा इंस्टंट व्हिसा घेतला. पत्नीला दागिन्याचे फोटोही पाठवले. हीच दुबईची पूर्ण कहाणी आहे,'' असं स्पष्टीकरण शमीने दिलं. ''मी सध्या ज्या परिस्थितीचा सामना करत आहे, ती कुणी अनुभवली असेल असं वाटत नाही. ही कोणत्याही कुटुंबासाठी कठीण वेळ आहे. ज्या व्यक्तीवर आपलं सर्वात जास्त प्रेम असतं, तिच असे आरोप करते तो प्रसंग वाईट असतो,'' असं शमी म्हणाला. ''पत्नी हसीनने हे सर्व करण्याअगोदर शमीसोबत एकदा चर्चा करायला हवी होती का? शमीचा आणि मुलीचा विचार करायला पाहिजे होता का, कुटुंबाचा विचार गरजेचा होता का, यावरही शमीने उत्तर दिलं. ''सध्या मी प्रेशरमध्ये आहे. अजूनही पहिल्यासारखं जीवन जगण्यासाठी आणि हे सर्व सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे,'' असं तो म्हणाला. ''माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर अचानक हे आरोप लागणं अत्यंत धक्कादायक आहे,'' असं शमी म्हणाला. सोशल मीडियावर शमी आणि पत्नीला ट्रोल केलं जात आहे. त्यावर आपण पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं शमी म्हणाला. तिच्या पाठीशी अगोदरही होतो आणि आताही आहे, पुढेही राहिन. मुलगी आणि कुटुंबाचा प्रश्न आहे तोपर्यंत यासाठी प्रयत्न करेन, असं तो म्हणाला. हे काम पत्नीचं असू शकत नाही : शमी दरम्यान, या सर्व प्रकरणात कुणाचा तरी हात असल्याची शंकाही शमीने व्यक्त केली. ''घरातला वाद तेव्हाच बाहेर निघतो, जेव्हा त्याच्या मागे कुणाचा हात असतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असेल, शेवटच्या दिवसापर्यंत करत असेल, मात्र अचानक दोनच दिवसात एवढा मोठा बदल होतो. हे तिचं (हसीन जहा) काम असू शकत नाही,'' असं शमी म्हणाला. एवढे गंभीर आरोप आणि एफआयआर दाखल केल्यानंतरही आपली पत्नी चुकीची नसल्याचं शमी म्हणाला. ''तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते मला माहित आहे. घरात आमचं कधी भांडण झालं तर ती माझं खाणं-पिणं बदं करते. आमच्यात समजुतदारपणा आहे. मात्र गैरसमजामुळे हे सगळं झालं आहे. माझं कुटुंब पुन्हा एक होण्यासाठी मी प्रयत्न करेन,'' असं शमी म्हणाला. संबंधित बातम्या :
... तर मोहम्मद शमीच्या करिअरला पूर्ण विराम मिळणार!
हसीनचं मानसिक संतुलन बिघडलं आहे : मोहम्मद शमी
शमीचा मॅच फिक्सिंगमध्ये हात? पत्नी हसीन जहाँच्या आरोपांनी खळबळ
आणखी वाचा























