दिल्लीला दुखापतींचं ग्रहण; राजस्थानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली. पाचव्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर मिड ऑनला क्षेत्ररक्षण करताना श्रेयसला ही दुखापत झाली.
IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्स आणि खेळाडूंच्या दुखापती हे यंदाच्या आयपीएल मोसमातलं समीकरण होत चाललंय. काल झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली. पाचव्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर मिड ऑनला क्षेत्ररक्षण करताना श्रेयसला ही दुखापत झाली. दुखापतीनंतर श्रेयसनं तातडीनं मैदान सोडल. यावेळी त्याला वेदना होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर मैदानाबाहेर गेलेला श्रेयस सामना संपेपर्यंत ड्रेसिंग रुममध्येच दिसला. श्रेयसच्या अनुपस्थितीत शिखर धवननं कर्णधारपदाची भूमिका पार पाडली.
श्रेयसची दुखापत गंभीर?
श्रेयसच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही बातमी आलेली नाही. पण सामना संपल्यानंतर धवननं श्रेयसला वेदना जाणवत असल्याचं म्हटलं होतं. श्रेयसची दुखापत गंभीर असल्यास दिल्ली कॅपिटल्सला मात्र याचा मोठा फटका बसू शकतो. कारण याआधी दिल्लीचे तीन खेळाडू दुखापतीमुळे जायबंदी झाले आहेत.
अमित, ईशांत आऊट; रिषभ जायबंदी
दुखापतीला सामोरा जाणारा श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या मोसमातला चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी लेग स्पिनर अमित मिश्राला बोटाच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकावं लागलं होतं. त्यानंतर दिल्लीचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माही दुखापतीच्या कारणास्तव यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. ईशांतला सरावादरम्यान ही दुखापत झाली होती.
अमित मिश्रा आणि ईशांतनंतर रिषभ पंत हा जायबंदी होणारा दिल्लीचा तिसरा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंतला ही दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर गेल्या दोन सामन्यात तो खेळू शकलेला नाही. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आणखी एक ते दीड आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
या सगळ्या दुखापतींच्या पार्श्वभूमीवर श्रेयसला झालेली दुखापत नक्कीच दिल्लीची चिंता वाढवणारी आहे.