Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालचे दणक्यात पदार्पण, आई-वडिलांना शतक केले समर्पित, वाचा काय म्हणाला...
India vs West Indies : डोमिनिका येथे सुरु असलेल्या कसोटीवर भारताने पकड मजबूत केली आहे.
Yashasvi Jaiswal India vs West Indies : डोमिनिका येथे सुरु असलेल्या कसोटीवर भारताने पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली मैदानावर खेळत होते. यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. 21 वर्षीय यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात शतक झळकावले. शतकानंतर यशस्वी जयस्वाल भाविनक झाला होता. यशस्वीने शतक झळकावल्यानंतर प्रतिक्रिया दिली.. त्याने आपले शतक आई-वडिलांना समर्पित केले.
शतक झळकावल्यानंतर यशस्वी जयस्वाल म्हणाला की, 'मी खूप इमोशन झालो होतो. ज्यांनी मला मदत केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. हे शतक माझ्यासाठी खास आहे. हे शतक मी आई-वडिलांना समर्पित करतो. माझ्या यशामध्ये आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. मी आणखी काही बोलू शकत नाही, मी खूश आहे. आता फक्त सुरुवात आहे, अजून खूप चांगली कामगिरी करायची आहे. ' दरम्यान, यशस्वी जयस्वाल याचे ड्रेसिंग रुममध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. सर्व खेळाडूंनी यशस्वीच्या शतकी खेळीचे कौतुक केले.
पदार्पणात यशस्वी जयस्वालने शतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. यशस्वी जयस्वाल 143 धावांवर खेळत आहे. या खेळीत यशस्वीने 14 चौकार लगावले आहेत. पदार्पणात विदेशात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल दहावा भारतीय फलंदाज झालाय. त्याशिवाय पदार्पणातच सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रमही यशस्वी जयस्वालने केला आहे. पदार्पणात विदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यशस्वी जयस्वाल याने केला आहे, याआधी असा पराक्रम कुणालाही करता आला नाही.
A special dedication after a special start in international cricket! 😊#TeamIndia | #WIvIND | @ybj_19 pic.twitter.com/Dsiwln3rwt
— BCCI (@BCCI) July 14, 2023
पदार्पणात कुणी कुणी शतक ठोकले -
यशस्वी जयस्वाल 2023, वेस्ट इंडिज - विदेशात
श्रेयस अय्यर 2021, न्यूझीलंड, मायदेशात
पृथ्वी शॉ 2018, वेस्ट इंडिज - मायदेशात
रोहित शर्मा 2013, वेस्ट इंडिज, मायदेशात
शिखर धवन 2013, ऑस्ट्रेलिया, मायदेशात
सुरेश रैना 2010, श्रीलंका, विदेशात
विरेंद्र सेहवाग 2001, दक्षिण आफ्रिका, विदेशात
सौरव गांगुली 1996, इंग्लंड, विदेशात
प्रविण आमरे 1992, दक्षिण आफ्रिका विदेशात
मोहम्मद अझरुद्दीन 1984, इंग्लंड, मायदेशात
पदार्पणात शतक झळकावणारा तिसरा भारतीय सलामी -
पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल तिसरा भारतीय सलामी फलंदाज ठरला आहे. शिखर धवन पदार्पणात शतक झळकावणारा पहिला भारतीय सलामी फलंदाज आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात शिखर धवन याने पदार्पणात 187 धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉ दुसरा सलामी फलंदाज आहे. या यादीत आता यशस्वीचे नाव जोडले गेलेय.
पदार्पणात शतक झळकावणारा चौथा युवा -
पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल चौथा युवा फलंदाज आहे. यशस्वीने 21 वर्ष 196 दिवस असताना शतक झळकावले. पृथ्वी शॉ याने 18 वर्ष 329 दिवसाचा असताना शतक झळकावले होते. अब्बास अली बेग याने 20 वर्ष 126 दिवसाचा असताना शतक झळकावलेय. गुंडप्पा विश्वनाथ याने 20 वर्ष 276 दिवसाचा असताना शतक झळकावले होते. मोहम्मद अजहरूद्दीन याने 21 वर्ष 327 दिवसाचा असताना शतक झळकावले.