Bhagwangad Namdev Shastri: ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्यांची मानसिकताही विचारात घ्यायला हवी, धनंजय मुंडेंची पाठराखण करताना नामदेवशास्त्री काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी काल भगवान गडावर मुक्काम केला होता. त्यांनी भगवान गडाच्या महंतांशी चर्चा केली. त्यानंतर आज नामदेव शास्त्रींनी लगेच पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यापाठीमागे बीडच्या भगवान गडाने आपली ताकद उभी केली आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांनी शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रकरणात भगवान गड खंबीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभा आहे, असे वक्तव्य करुन नामदेव शास्त्री महाराज यांनी भाजप आणि अजित पवार यांना मेसेज दिल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला धक्का लागल्यास वंजारी समाजाची नाराजी ओढावून घ्याल, असा अप्रत्यक्ष इशारा भगवान गडाने (Bhagwangad beed) दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या पत्रकार परिषदेत नामदेव शास्त्री यांनी केलेली काही वक्तव्य वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, याचा विचार झाला पाहिजे, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले.
नामदेव महाराज शास्त्री नेमकं काय म्हणाले?
आमच्या दोघांची राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक विषयावर चर्चा झाली. त्यांच्या मानसिकतेचा आम्ही आढावा घेतला. सगळं समजून घेतल्यानंतर मला असे जाणवले की, इतक्या वर्षापासून ते आमच्या जवळ आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. सगळ्या नेत्यांसोबत ते राहिलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आमच्या समाजाचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या सातशे वर्षापासून जातीयवाद नसावा, या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीयवाद उफाळून आणला. संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले, असे मला वाटत आहे. जातीय सलोखा नष्ट होत चालला आहे.
धनंजय मुंडे गुन्हेगार नाही आहे, हे मी १०० टक्के सांगू शकतो. भगवान गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. पक्षाचे नेते आहेत, त्यांनाही याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय किती ताणायचा किंवा धरायचा, हा ज्याचा त्याचा विषय आहे. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. मी काल बोलता बोलता धनंजयला बोललो की, आमच्या क्षेत्रात इतका त्रास करणारा असता तर संत झाला असता. ते इथे आले आहेत तरी त्यांच्या हाताला सलाईन लावलेले आहे. एखाद्या माणसाने किती सहन करावे?
याप्रकरणात दोन भाग आहेत, गुन्हेगारांचा शोध सुरु आहे. मला मीडियाला विचारावं वाटतं की, ज्या लोकांनी निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण अगोदर त्यांना जी मारहाण झाली, ते पण दखल घेण्याजोगी आहे. तो त्यांचा गावातील बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन बीडमधील सामाजिक सलोख बिघडला असे मला वाटत आहे. तो त्यांच्या गावाचा मुद्दा आहे. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत, ज्यावर मिडिया आक्षेप घेतोय. गेल्या 53 दिवसांपासून मिडिया ट्रायल सुरु आहे. धनंजय मुंडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या सगळ्याचा समाजावर आणि वारकरी संप्रदायावर भयानक परिणाम झाला आहे. जातीयवाद ज्यांना माहिती नाही, त्यांनाही मीडियामुळे माहिती झाला. जे संत सामाजिक सलोखा तयार करतात, त्यांच्यातही तेढ निर्माण होते. राजकीय स्वार्थ आमच्यादृष्टीने क्षणिक असतो. पण कायमस्वरुपी सामाजिक सलोखा बिघडवणे यासारखे पाप नसते, असे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
