WTC Final Venue: WTC चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार नाही?; जय शहा यांची ICC सोबत चर्चा, नेमकं काय म्हणाले?
WTC Final Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.
WTC Final Venue: भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (ICC World Test Championship) फायनलमध्ये दोनवेळा धडक दिली, परंतु त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गतवर्षी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचा चषक उंचावला. आता भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. याचदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. (WTC Final Venue)
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे मागील दोन्ही अंतिम सामने इंग्लंडमध्ये झाले होते. 2019-2021 सत्राचा अंतिम सामना साउथहॅम्प्टन, इंग्लंड येथे झाला, तर 2021-2023 सत्राचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. तिसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमचीही निवड करण्यात आली आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयसीसी अधिकाऱ्यांशी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याचे ठिकाण बदलण्याबाबत चर्चा केली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतात होणार?
प्रसारमाध्यमांशी बोलताना जय शाह यांनी सांगितले की, मी आयसीसीच्या अधिकाऱ्यांशी बोललो असून ते स्थळ बदलण्याच्या विषयावर चर्चा करतील. मी WTCची फायनल 2027 इतर ठिकाणी आयोजित करण्याच्या मुद्द्यावर आयसीसी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शाह यांच्या म्हणण्यानुसार, जगात कसोटी क्रिकेटची फक्त 3 मुख्य केंद्रे आहेत. यामध्ये जी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारताचा समावेश आहे. जय शहा यांनी सांगितले की, जेव्हा अंतिम सामना होतो, तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि भारतात पावसाळा असतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी WTCचा अंतिम सामना होऊ शकत नाही.
भारताचा दोनदा पराभव-
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. त्या कमी धावसंख्येच्या सामन्यात, न्यूझीलंडने 8 गडी राखून विजय मिळवून इतिहासातील पहिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनला. 2023 मध्ये दुसऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. यावेळी कांगारूने भारताचा 209 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
भारत तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळण्याच्या मार्गावर-
2023-2025 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेवर नजर टाकली, तर भारतीय संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 6 विजय नोंदवले आहेत आणि सध्या 68.52 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया सध्या या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 62.5 टक्के सामने जिंकले आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या:
'माझी भूमिका नव्हती...'; इशान अन् श्रेयसला करारातून कोणी काढले?, जय शहा यांनी नाव सांगितले!