(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK T20 Live Streaming: महिला विश्वचषकात रंगणार भारत-पाकिस्तान मुकाबला, कधी, कुठे पाहाल सामना?
INDW vs PAKW: महिला टी20 वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आपला सलामीचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
IND vs PAK : महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) स्पर्धा अखेर सुरु झाली आहे. शुक्रवारी रात्री खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेकडून 3 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. विश्वचषकात आज दोन सामने होणार आहेत. एका सामन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघ आमनेसामने असतील तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 12 फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान असेल.
भारत आणि पाकिस्तानचे संघ 'ब' गटात आहेत. या गटात इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज हे संघही आहेत. पाच संघांच्या या गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचप्रमाणे अ गटातही 5 संघ असून त्यापैकी दोन संघांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार आहे. 'ब' गटातून भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचतील, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, या गटात ज्या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत तो सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातच होणार आहे.
कधी आणि कुठे पाहणार भारत-पाकिस्तान सामना?
भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमधील हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सामना सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताचा वरचा हात
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचा वरचष्मा आहे. या कालावधीत भारताने 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने केवळ 3 सामने जिंकले आहेत.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड. .
पाकिस्तान संघ : बिस्माह मारूफ (कर्णधार), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयशा नसीम, फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शम्स, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.
भारतासाठी चिंतेची बातमी
या सामन्याआधी टीम इंडियाची (Team India) उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दुखापतीमुळे सामन्याबाहेर होऊ शकते. दरम्यान स्मृती मंधाना या सामन्यातून बाहेर राहिल्यास संघाच्या फलंदाजीवर मोठा दबाव निर्माण होऊ शकतो. मंधानाने 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही भाग घेतला नव्हता. स्मृतीला ही दुखापत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान झाली होती.
हे देखील वाचा-