IND vs NZ 1st Test Virat Kohli : शून्यावर आऊट, तरीही कोहलीचा मोठा विक्रम; MS धोनीला मागे टाकले!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे.
India vs New Zealand 1st Test Virat Kohli Duck : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे पहिला दिवस रद्द करण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जिथे भारताची सलामीची ऑर्डर 10 षटकात पूर्णपणे कोलमडली. यामध्ये विराट कोहली शून्यावर बाद झाला. या सामन्यात विराट मैदानात येताच त्याने एमएस धोनीचा एक विक्रमही मोडला.
विराट कोहली शून्यावर आऊट
दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल भारताला चांगली सुरुवात करतील, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. कर्णधार रोहित 16 चेंडूत केवळ 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यापूर्वी विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा, पण न्यूझीलंडविरुद्ध विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला पण 9 चेंडू खेळून 9व्या षटकात शून्यावर बाद झाला. विराट कोहलीने आतापर्यंत 116 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये कोहली 15 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. विराट कोहलीने 53 धावा केल्या असत्या तर तो 9 हजार धावांच्या क्लबमध्ये सामील झाला असता. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 8947 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने मोडला MS धोनीचा विक्रम
नाणेफेक दरम्यान, रोहित शर्माने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनची यादी जाहीर करताच विराट कोहलीने एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला. कारण या प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट कोहलीचेही नाव होते. या सामन्यापूर्वी एमएस धोनी भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र आता विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळून सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 536 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर एमएस धोनीने भारतासाठी 535 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू
1) सचिन तेंडुलकर - 664
2) विराट कोहली - 536
3) एमएस धोनी - 535
4) राहुल द्रविड - 504
5) रोहित शर्मा - 486
हे ही वाचा -