(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : बॅटिंगमधील फॉर्म परतलाच पण फिल्डिंगमध्येही कोहलीची हवा, सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दाखवलं चमकदार क्षेत्ररक्षण
AUS vs IND : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळवला, या विजयात माजी कर्णधार विराटचा वाटाही मोठा होता.
AUS vs IND, Warm-up Match : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) या ब्रिस्बेनच्या गाबा येथे पार पडलेल्या सराव सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला, यावेळी अखेरच्या षटकात मोहम्मद शमीनं तीन विकेट्स घेत कमाल केली. ज्यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा होती पण याच सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानं देखील मोलाची आणि महत्त्वाची कामगिरी निभावली. विशेष म्हणजे बॅटिंगमध्ये तो चमकला नसला तरी क्षेत्ररक्षणात त्याने दमदार कामगिरी केली. यावेळी सीमारेषेवर घेतलेला पॅटचा अप्रतिम झेल आणि टीम डेव्हीडला धावचित करताना टाकलेली चित्त्यासारखी झेप याचा समावेश आहे.
तर भारताने सामन्यात आधी फलंदाजी करत 187 धावांचं टार्गेट ऑस्ट्रेलियाला दिलं. कांगारुनी देखील सुरुवातीपासून संयमी खेळी करत विजयाच्या दिशेने यशस्वी पाठलाग सुरु ठेवला. त्यामुळे भारताला विकेट्सची अत्यंत गरज होती. याच दरम्यान 19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कोहलीनं टीम डेव्हीडला चित्त्याप्रमाणे झेप घेत धावचीत केलं. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आणि भारताला दिलासा मिळाला. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्येही शमीच्या बोलिंगवर पॅटचा सीमारेषेवर एकहाताने अफलातून कॅच कोहलीने पकडला आणि दाखवून दिलं की कोणत्याही ठिकाणी कोहली दमदार क्षेत्ररक्षण करु शकतो. विशेष म्हणजे या दोन विकेट्समुळे भारताचा विजय सोपा झाला. विशेष म्हणजे या दोन्ही विकेट्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते कोहलीचं कौतुक करत आहेत.
What a throw by virat kohli pic.twitter.com/fDDpRKpg80
— Kevin ABD¹⁷ (@Kevin_ABD17) October 17, 2022
Unbelievable catch by virat kohlipic.twitter.com/Lad9yxiZP9
— Kevin ABD¹⁷ (@Kevin_ABD17) October 17, 2022
भारताचा 6 धावांनी रोमहर्षक विजय
टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं बोलिंग घेतली आणि त्यामुळे भारताला फलंदाजीला मैदानात यावं लागलं. सलामीवीर केएल आणि रोहितनं चांगली सुरुवात केली. पण 15 धावा करुन रोहित तंबूत परता मग कोहीलीही 19 धावा करुन बाद झाला, पण केएलने दमदार खेळी सुरु ठेवली. त्याला सूर्यकुमारनही चांगली साथ दिली. राहुल आणि सूर्या दोघांनी अर्धशतकं झळकावत अनुक्रमे 57 आणि 50 धावा केल्या. दिनेशनं 20 धावांचं योगदान दिलं आणि भारतानं 187 धावाचं लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि आरॉन फिंच यांनी कमाल सुरुवात केली. 35 धावा करुन मार्श बाद झाला पण कॅप्टन फिंच क्रिजवर कायम होता. स्मिथ आणि मॅक्सवेलनं प्रत्येकी 11 आणि 23 धावा केल्या, पण त्या दोघानंतर इतर फलंदाजांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. फिंचनं अर्धशतक झळकावून संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. पण 19 व्या ओव्हरमध्ये हर्षलनं त्याला 76 धावांवर बाद केलं आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत झाल्या. त्यानंतर शेवटची ओव्हर टाकण्यासाठी शर्मानं प्लेईंग 11 मध्ये नसणाऱ्या मोहम्मद शमीला मैदानात बोलवलं आणि शमीने कमाल करत सामना भारताला जिंकवून दिला. शमीने पहिल्या दोन चेंडूवर प्रत्येकी दोन धावा दिल्यानंतर अखेरच्या चारही चेंडूत विकेट्स मिळवल्या. यातील एक विकेट रनआऊट असल्यानं शमीची हॅट्रीक हुकली पण त्यानं सामना भारताला 6 धावांनी जिंकवून दिला.
हे देखील वाचा-