Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Vinod kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचारासाठी जिंदादिल डॉक्टर सरसावले आहेत.
मुंबई : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती एकदा खालावली आहे. त्यांना भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी हे त्यांच्या प्रकृतीच्या समस्येने त्रस्त आहेत. शनिवारी रात्री विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद कांबळी यांच्या प्रकृती ठीक नसल्याचा व्हिडिओ समोर येताच जिंदादिल डॉक्टर त्यांच्या उपचारासाठी सरसावले आहेत.
काही दिवसांपूवी दिवंगत प्रशिक्षक आचरेकर सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिवाजी पार्क मैदानात त्यांचे स्मारक उभारण्यात आले. या कार्यक्रमाला विनोद कांबळी यांनी हजेरी लावली होती. यावेळी विनोद कांबळी यांना नीट उठताही आणि बोलताही येत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांच्या अवस्था पाहून सर्वांनाच दु:ख झाले होते.
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल
याच कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली होती. या भेटीची जोरदार चर्चा सोशल मिडियावर रंगली होती. तर विनोद कांबळी यांची आर्थिक स्थिती ढासळल्याचे पाहून माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली होती. त्यातच आता विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विनोद कांबळींवर मोफत उपचार
दरम्यान, आकृती हॉस्पिटलचे संचालक क्रिकेट प्रेमी असल्याने त्यांनी अनेकदा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचे क्रिकेट पाहिले आहेत. परंतु, त्यांची प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी विनोद कांबळी यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.
विनोद कांबळींची कारकीर्द
विनोद कांबळी यांची क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 1991 मध्ये झाली. 1991 साली त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर 1993 साली त्यांनी कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. 2000 च्या दशकात विनोद कांबळी यांचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला. म्हणून त्यांना 2000 सालानंतर टीम इंडियात स्थान मिळाले नाही. विनोद कांबळी 2000 साली शारजाहमध्ये शेवटची मालिका खेळले होते. त्यानंतर टीममध्ये कमबॅकसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या