U19 Women's T20 WC Final : अंडर 19 विश्वचषक फायनल काही वेळातच, नाणेफेक जिंकत भारताने निवडली गोलंदाजी
INDW vs ENGW U-19 T20 WC: अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत फायनलचा सामना भारत विरुद्ध इंग्लंड असा रंगत आहे.
U19 Women's T20 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेत सुरु 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाचा अंतिम सामना आज पार पडत आहे. फायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचं आव्हान असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत फायनल गाठली आहे. दुसरीकडे इंग्लंड महिला संघानेही फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आज T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाचा स्पर्धेतील फॉर्म पाहता ही फायनल अगदी चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कामगिरीचा विचार करता सुरुवातीपासून भारताने चांगली कामगिरी केली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्यानंतर स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या न्यूझीलंडला भारतानं आठ विकेट्स राखून मात देत सामना जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसरीकडे इंग्लंड संघाचा विचार करता त्यांनीही आपल्या नावाला साजेशी खेळी सुरुवातीपासून केली होती. सेमीफायनलमध्ये त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान होतं, जे देखील त्यांनी पार करत फायनल गाठली आहे. आता आज फायनल जिंकून विश्वचषक उंचावण्यासाठी भारत आणि इंग्लंडच्या महिला आमने-सामने आहेत.
View this post on Instagram
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय महिला संघ -शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता शेहरावत, सौम्या तिवारी, गोंगडी त्रिशा, ऋचा घोष (विकेटकीपर), हृषिता बसू, तीतस साधू, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोप्रा, सोनम यादव
इंग्लंड महिला संघ - ग्रेस स्क्रिव्हन्स (कर्णधार), लिबर्टी हीप, नियाम फिओना हॉलंड, सेरेन स्माले (विकेटकीपर), रायना मॅकडोनाल्ड गे, चॅरिस पावली, अलेक्सा स्टोनहाउस, सोफिया स्मेल, जोसी ग्रोव्हस, एली अँडरसन, हन्ना बेकर
हे देखील वाचा-