Team India Squad for Champions Trophy 2025 : बुमराहशी त्याची तुलना तुम्हाला पटते का....; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणाला घेण्यावरून वाद पेटला; माजी सलामीवीर BCCI वर भडकला
Aakash Chopra on Harshit Rana : निवड समितीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संघाची घोषणा केली आहे.

Team India Squad for Champions Trophy 2025 : निवड समितीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संघाची घोषणा केली आहे. अनफिट जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघासोबत दुबईला जाणार नाही. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान सिडनी कसोटीत बुमराहला पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेत खेळू शकणार नाही अशी अटकळ आधीच होती.
बीसीसीआय त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते आणि अलीकडेच त्याच्या दुखापतीचे स्कॅन देखील करण्यात आले. शेवटी, त्याला स्पर्धेतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यासोबत यशस्वी जैस्वाललाही वगळण्यात आले आहे. बुमराहच्या जागी टीम इंडिया व्यवस्थापनाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान दिले आहे. यावर भारतीय संघाच्या माजी सलामीवीर खेळाडूने हर्षित राणाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतीय संघाचे माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी हर्षित राणाच्या निवडीवर आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच्या यूट्यूब चॅनलवर आपले मत व्यक्त करताना आकाश म्हणाला, इंग्लंडच्या एकदिवसीय मालिकेत तो महागडा ठरला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी हर्षितचा संघात समावेश करण्यात आला. त्याने तिसरा सामनाही खेळला. व्यवस्थापन बुमराहचा पर्याय म्हणून हर्षितला स्वीकारण्यास तयार आहे पण त्याची तुलना बुमराहशी होऊ शकत नाही, बुमराहसारखा दुसरा कोणी नाही.
वरुण चक्रवर्तीबद्दल काय म्हणाला आकाश चोप्रा?
यशस्वी जैस्वालचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यापूर्वी जाहीर झालेल्या भारताच्या तात्पुरत्या संघात समावेश करण्यात आला होता, परंतु इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही, ज्यामुळे त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले. आता त्यांच्या जागी वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला आहे.
वरुण चक्रवर्तीच्या संघात सामील होण्याबाबत आकाश चोप्रा म्हणाला की, “बीसीसीआयने वरुणला समाविष्ट केले आहे आणि यशस्वी जैस्वालला वगळले आहे. हे केल्यानंतर आता आपल्याकडे पाच फिरकीपटू आहेत. तुम्हाला इतके फिरकीपटू का हवे आहेत? मला वाटले की भारतीय संघ यशस्वीला वगळू शकतो पण त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी वरुणला खेळवता येईल. मला यात धोका दिसतो तो म्हणजे तुम्ही कुलदीपच्या जागी वरुणला खेळवू शकता.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

