IND vs AUS : स्मिथ 5 वर्षांनंतर सांभाळणार एकदिवसीय संघाची धुरा, जाणून घ्या त्याचा आजवरचा रेकॉर्ड
IND vs AUS ODI Series : पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा संघाचा कर्णधार असेल. तो जवळपास 5 वर्षांनी ही जबाबदारी स्वीकारणार आहे .
IND vs AUS, ODI : भारताविरुद्धच्या (IND vs AUS) आगामी वनडे मालिकेत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार असेल. तो जवळपास पाच वर्षांनी एकदिवसीय संघाचं नेतृत्व करेल. मार्च 2018 मध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर त्याला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यानंतर कसोटी सामन्यांमध्ये नियमित कर्णधार नसल्यामुळे काही वेळा त्याला कर्णधारपदाची संधी मिळाली, पण वनडेमध्ये अशी परिस्थिती प्रथमच आली आहे.
स्टीव्ह स्मिथने 2015 मध्ये प्रथमच एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले. 2018 पर्यंत तो ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार होता. या तीन वर्षांत त्याने एकूण 51 एकदिवसीय सामन्यांचं नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांचं नेतृत्व करणारा तो सातवा खेळाडू आहे. स्मिथच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी तशी चांगली होती. स्मिथने (Smith) आपल्या कर्णधारपदाखाली ऑस्ट्रेलियाला 25 सामन्यात विजय मिळवून दिला आणि 23 सामन्यांमध्ये त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तसंच तीन सामने अनिर्णित ठरले.
कर्णधार म्हणून स्मिथची फलंदाजी कशी आहे?
स्टीव्ह स्मिथने कर्णधार (Steve Smith as Captain) म्हणून 51 एकदिवसीय सामन्यांच्या 50 डावात 1984 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 45.09 आणि स्ट्राईक रेट 84.96 होता. ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार (Australia ODI Captain) असताना त्याने 5 शतकं आणि 12 अर्धशतकं केली आहेत. जर आपण स्टीव्ह स्मिथच्या एकूण एकदिवसीय रेकॉर्ड्सवर नजर टाकली तर त्याने एकूण 139 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि या सामन्यांच्या 124 डावांमध्ये त्याने 45.11 च्या सरासरीने आणि 87.64 च्या स्ट्राईक रेटने 4917 धावा केल्या आहेत. म्हणजेच भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत स्मिथला वनडेत 5 हजार धावा पूर्ण करण्याची संधी असेल.
भारताविरुद्ध स्मिथचा एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट
स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत. येथे त्याने 62.38 च्या उत्कृष्ट फलंदाजी सरासरी आणि 105.05 च्या स्ट्राईक रेटने 1123 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावा फक्त भारतीय संघाविरुद्ध केल्या आहेत.
कसा आहे ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ?
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
हे देखील वाचा-