सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर, नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला
नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणातील निवडणूका राणे घराण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूकही आता जाहीर झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणातील निवडणूका राणे घराण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूकही आता जाहीर झाल्याने आता उमेदवार आणि या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता 30 डिसेंबरला निवडणूक तर मतमोजणी 31 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज आज 29 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरपर्यंत उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे दाखल करता येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक सिंधुदुर्गातील राजकारणाच्या दृष्टीने तसेच भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची राजकीय लढाई आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासाठीही ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असून भाजपाच्या दृष्टीनेही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असणार आहे.
मविआ विरुद्ध भाजपा
महाविकास आघाडी आणि भाजप असा सामना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील तीन पक्ष या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्या दृष्टीने गेले सहा महिन्यांहून अधिक काळ रणनीती आखली जात आहे. मात्र वारंवार निवडणूक लांबणीवर पडत असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला ताणलेली असतानाच आता अखेर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता राणेंसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.
कोरोनामुळे मुदतवाढ
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 177 मतदार सभासद संस्था कार्यरत आहेत. यापैकी 982 संस्था मतदान करण्यास पात्र ठरल्या. तर 195 संस्था मतदानातून बाहेर गेल्या होत्या. अंतिम यादीत नाव न आल्यामुळे यातील काही संस्था उच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र उच्च न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला असून या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची पंचवार्षिक मुदत मे २०२० मध्ये संपली. मात्र कोरोना प्रभावामुळे राज्य शासनाने जिल्हा बँकेला मुदतवाढ दिली होती.
निवडणूक चुरशीची होणार
राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा बँक एकमेव 'अ' वर्गात असलेली सहकारी संस्था आहे. गेले वर्षभर बँक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राजकारण शिजत आहे. सध्या या बँकेवर त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत निवडून आलेल्या संचालकांची राणेंची सत्ता होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत शिवसेनेत गेले. त्यामुळे सध्या जिल्हा बँकेवर शिवसेनेचा अध्यक्ष असून सत्ता महाविकास आघाडीची आहे. आता जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी संकेत दिले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील सहकार विभागाचे लक्ष आता जिल्हा बँकेकडे लागले आहे. गेले वर्षभर शिवसेना आणि भाजप आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याच्या वल्गना करीत आहे. त्यामुळे ही निवडणूक आतापर्यंतच्या जिल्हा बँक इतिहासात चुरशीची होणार हे निश्चित.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा इतिहास
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर 1 जुलै 1983 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची स्थापना झाली. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 38 वर्ष पूर्ण झाली. दरम्यानच्या काळात अनेक वर्षे जिल्हा बँक राणेंच्या ताब्यात राहिली. मात्र राणेंचा सहकार क्षेत्रातील शिलेदार सतीश सावंत यांनी विधानसभेच्या निवडणुकी आधी राणेंपासून फारकत घेत शिवसेनेत प्रवेश केला. सतीश सावंत हे विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष आहेत. आता सतीश सावंत ही जिल्हा बँक शिवसेनेकडे ठेवतात की भाजपाच्या माध्यमातून राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपल्याकडेच ठेवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
2008 पासून 2019 पर्यत सिंधुदुर्ग जिल्हा बँक राणेंच्या ताब्यात होती. 2019 ला शिवसेनेकडे ही जिल्हा बँक गेली. त्यामुळे आता राणे जिल्हा बँक पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर शिवसेना आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँक आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण राणेंचे प्रतिस्पर्धी शिवसनेनेकडे आता जिल्हा बँक आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणेंची प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मानहानीच्या प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा, कोर्टाकडून 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर- काय आहे प्रकरण?
- महानगरपालिका,नगरपरिषद उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
- 'संसदीय कामकाजात सरकारला रस नाही, 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन', देवेंद्र फडणवीसांची नाराजी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha