(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आपल्या भावाचा नादच करायचा न्हाय; रोहितनं कांगारुंना पळवू पळवू धुतला, रेकॉर्ड्सचा धो-धो पाऊस पाडला!
IND vs AUS: टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला हरवून, ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक दिलीय. पण याचं श्रेय कर्णधार रोहित शर्माला जातं.
Rohit Sharma, IND vs AUS Match Highlights: नवी दिल्ली : टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या आतषबाजीनं सेंट ल्युशियाचं डॅरेन सॅमी स्टेडियम काल निनादून गेलं. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या (T20 World Cup) सुपर एट साखळीत टीम इंडियाच्या कर्णधारानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं. या सामन्यात रोहित शर्माचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. पण या खेळीदरम्यान, त्यानं ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं षटकारांचं द्विशतक साजरं केलं. रोहितनं 41 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांसह 92 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या इतर फलंदाजांनीही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. त्यामुळंच टीम इंडियाला वीस षटकांत पाच बाद 205 धावांची मजल मारता आली.
टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय क्रिकेट संघानं मोठ्या दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सामना अगदी रोमहर्षक झाला असला तरीसुद्धा या सामन्याचा खरा हिरो ठरला टीम इंडियाचा धडाकेबाज कर्णधार आणि कोट्यवधि भारतीयांच्या गळ्यातील ताईत असलेला रोहित शर्मा. या सामन्यात रोहित शर्माला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. या सामन्यात रोहित शर्मानं 19 चेंडूत अर्धशतक केलं. त्याला आपलं शतक पूर्ण करता आलं नसलं तरी त्यानं 41 चेंडूत 92 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान रोहितनं 8 षटकार आणि 7 चौकार लगावले. रोहितच्या या खेळीनंतर आणि सामना जिंकल्यानंतर विक्रमांची मालिका सुरू झाली.
रोहितचे आठ दमदार षटकार, कांगारूंना पळता भुई थोडी...
रोहितनं आंतरराष्ट्रीय T20 मध्ये आपले 200 षटकार पूर्ण केले आहेत आणि असं करणारा तो जगातील पहिला क्रिकेटर बनला आहे. रोहितनं आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्यानं पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे.
दमदार, धडाकेबाज खेळीनंतर रोहित शर्मा याच्या विक्रमांची यादी
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम
4165 धावा : रोहित शर्मा (टीम इंडिया)
4145 धावा : बाबर आजम (पाकिस्तान)
4103 धावा : विराट कोहली (टीम इंडिया)
3601 धावा : पॉल स्टर्लिंग (आयरलँड)
3531 धावा : मार्टिन गुप्टिल (न्यूजीलँड)
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड
200 : रोहित शर्मा (टीम इंडिया)
173 : मार्टिन गुप्टिल (न्यूजीलँड)
137 : जोस बटलर (इंग्लंड)
134 : ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
132 : निकोलस पूरन (वेस्ट इंडीज)
कर्णधार म्हणून सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम
48 विजय : रोहित शर्मा (60 सामने)
48 विजय : बाबर आजम (85 सामने)
45 विजय : ब्रायन मसाबा (60 सामने)
44 विजय : ओएन मोर्गन (72 सामने)
T20 विश्वचषकात टीम इंडियासाठी वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम
12 : युवराज सिंह विरुद्ध इंग्लंड, डर्बन 2007
18 : केएल राहुल विरुद्ध स्कॉटलंड, दुबई 2021
19 : रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ग्रॉस आयलेट 2024
T20 विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्या
98 : ख्रिस गेल विरुद्ध टीम इंडिया (2010)
92 : रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2024)
88 : ख्रिस गेल विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2009)
85 : केन विल्यमसन विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2021)
T20 विश्वचषकात भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या
101 : सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका : ग्रॉस आयलेट (2010)
92 : रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ग्रॉस आयलेट (2024)
89* : विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज : वानखेडे (2016)
82* : विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मोहाली (2022)
82* : विराट कोहली विरुद्ध पाकिस्तान : मेलबर्न (2022)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार
130 : ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड
130* : रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया
88 : रोहित शर्मा विरुद्ध वेस्ट इंडिज
87 : ख्रिस गेल विरुद्ध न्यूझीलंड
86 : शाहिद आफ्रिदी विरुद्ध श्रीलंका