Rohit Sharma: लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
Ind Vs England Semi Final 2024: भारतीय संघाने इंग्लंडला 68 धावांनी लोळवत दिमाखात ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ एकमेकांना भिडतील.
India vs England Highlights, T20 World Cup 2024 Semi-Finals: भारतीय संघाने गुरुवारी रात्री ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडच्या संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या विजयामुळे भारतीय संघ 10 वर्षांनी ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरीमुळे भारतीय संघाने बलाढ्य इंग्लंडच्या संघाचा 68 धावांनी पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार आणि या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) भावूक होताना दिसला.
हा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये जाताना बाहेरच्या खुर्चीवर बसला होता. त्यावेळी रोहितला अश्रू अनावर झाले. यापूर्वी 2022 साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. त्यावेळी भारतीय संघ विजयासाठी हॉट फेव्हिरट समजला जात होता. मात्र, त्यावेळी भारतीय संघाची निराशा झाली होती. त्यामुळे काल झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील विजय रोहित शर्मा आणि टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मॅच संपल्यानंतर भारतीय खेळाडू आनंदाने ड्रेसिंग रुममध्ये जात होते तेव्हा रोहित शर्मा बाहेरच्या खुर्चीवर बसून होता. एक-एक खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये जात होता. ज्यावेळी विराट कोहली हा रोहित शर्माच्या खुर्चीजवळ आला आणि त्याने रोहितला हात मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रोहित शर्मा कमालीचा भावूक झाला. त्याचा हात डोळ्यांवर गेला आणि त्याने अश्रू पुसले. भावूक झाल्यामुळे भारतीय संघाचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतरही रोहित शर्मा खुर्चीवर बसून होता.
Rohit Sharma crying ??? pic.twitter.com/bbtRGTwNcK
— Jon | Michael | Tyrion (@tyrion_jon) June 27, 2024
इंग्लंडचा संघ भारताच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला
टीम इंडियाने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या संघापुढे विजयासाठी 172 धावांचे आवाहन ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 103 धावांमध्येच आटोपला. रोहित शर्माने या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत 57 धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार यादवच्या 47 आणि हार्दिक पांड्याने झटपट 23 धावा केल्याने भारतीय संघाला 171 धावांची मजल मारता आली. यानंतर इंग्लंडचा संघ टीम इंडियातील फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात अडकला. अक्षर पटेल आणि कुलदीप यादवच्या प्रभावी माऱ्यामुळे इंग्लंडचा संघ 103 धावांवर सर्वबाद झाला. अक्षर पटेल याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आणखी वाचा
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप