वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली असून 22 जानेवारीपर्यंत पीसीआर देण्यात आली आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) पोलीस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर, आरोपी कराडला कोर्टातून (Court) पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना कोर्टाबाहेर चांगलाच राडा पाहायला मिळाला. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेकांनी घोषणाबाजी केली, तर काहींनी वाल्मिक कराडला विरोधाही घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या अॅड. हेमा पिंपळे यांनी घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांनी बीड (Beed) जिल्ह्यात यावं, असं म्हटलं. तर, काही वकिलांनीही संविधानाचा दाखला देत वाल्मिक कराडवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलंय. त्यामुळे, बीडच्या कोर्टाबाहेरच राडा पाहायला मिळाला.
बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली असून 22 जानेवारीपर्यंत पीसीआर देण्यात आली आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर एसआयटी पथकाने वाल्मिक कराडला न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर कोर्टाबाहेर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. कोर्टाबाहेर वकिलांचेच दोन गट दिसून आले, त्यापैकी एका महिला वकिलाने वाल्मिक कराडवर आरोप करत फाशीची शिक्षा द्या म्हणत घोषणाबाजी केली. तर, एका वकिलाने वाल्मिक कराड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचं म्हणत त्यांचे समर्थन केले, तसेच आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचं म्हटलं. त्यानंतर, पोलीस व इतर सुरक्षा रक्षकांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं.
तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळती-जुळती
दरम्यान, आज न्यायालयाती वाल्मिक कराडच्या मकोका गु्न्ह्यासंदर्भात सुनावणी झाली. त्यामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुखची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली, त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान 10 मिनिटांच्या कालावधीत सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून एकमेकांशी संभाषण झाल्याची माहिती SIT ने कोर्टात दिली आहे. या तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झालं याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या कस्टडीची मागणी SIT तर्फे करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याचंही एसआयटीने म्हटलं.
वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची यादी कोर्टात
विशेष म्हणजे 9 डिसेंबर रोजीच दुपारी 3 ते 3.15 दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण झालेलं होतं. त्याच वेळेच्या जवळपासच तिघांमध्ये फोन कॉल झाल्याचे रेकॉर्डवरुन दिसत असल्याचे एसआयटीने म्हटलं आहे. तसेच, वाल्मिक कराडवर या आधी दाखल झालेले गुन्ह्यांची यादी कोर्टात सरकारी पक्षाकडून सादर केली. इतर आरोपीविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. वाल्मिक कराडवर MCOCA कसा लावण्यात आला, याचा संदर्भही देण्यात आला आहे. दरम्यान, वाल्मिकने हत्येच्या दिवशीही संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा एसआयटीने केला आहे. वाल्मिकच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने 9 ते 10 ग्राउंडस न्यायालयात मांडले. कोर्टातला हा संपूर्ण युक्तिवाद इन कॅमेरा झाला आहे.
सरकारी वकीलाचे न्यायालयातील म्हणणे
वाल्मिक कराडच्या विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सुरू आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि कराड यांमध्ये इंटरलिंक काय आहेत? याचा तपास सुरू आहे. तसेच, फरार आरोपी अजून सापडायचा आहे. फरार कृष्णा आंधळेला लपवण्यात यांचा हात आहे का? याची माहिती घ्यायची आहे. घुले आणि चाटे अनेक दिवस फरार होते, त्यांना कोणी मदत केली? याची माहिती घेणं सुरू आहे. त्यामुळे, आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी सरकारी वकिलाने न्यायालयात केली होती.
वाल्मिक कराडची अटक बेकायदा - ठोंबरे
खुनाच्या प्रकरणातील कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही. वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. त्यामुळे, वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. वाल्मिक कराड यांची अटक बेकायदेशीर आहे, असे वाल्मिक कराडचे वकिल सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयात म्हटले.
हेही वाचा
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी