Roger Binny : आशिया कपआधी टीम इंडियात मोठी उलथापालथ, रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा, कुणाला मिळाली खुर्ची?
Roger Binny Steps Down As BCCI President News : आशिया कप 2025 च्या अगोदरच बीसीसीआयमध्ये मोठी उलथापालथ दिसत आहे.

BCCI Roger Binny News : आशिया कप 2025 च्या अगोदरच बीसीसीआयमध्ये मोठी उलथापालथ दिसत आहे. रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, पुढील निवडणुकीपर्यंत उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे कार्यवाहक अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
काय आहे नियम?
बीसीसीआयच्या घटनेनुसार, वयाच्या 70 व्या वर्षानंतर कोणत्याही अधिकाऱ्याला आपले पद सोडावे लागते. अशा परिस्थितीत, टीम इंडियाचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी या पदावर राहण्यास अपात्र ठरतील. वृत्तानुसार, राजीव शुक्ला काही महिन्यांसाठी पदभार स्वीकारतील. नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत ते कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम करतील. राजीव शुक्ला 2020 पासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.
🚨 NO BINNY AS BCCI PRESIDENT. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 29, 2025
- Rajiv Shukla has been appointed as BCCI's acting President. (Abhishek Tripathi). pic.twitter.com/2bU6ruvUqe
बुधवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत त्यांनी कार्यवाहक अध्यक्षपद स्वीकारले. या बैठकीत टीम इंडियासाठी नवीन मुख्य प्रायोजकाची निवड हा मुख्य मुद्दा होता. ड्रीम-11 माघार घेतल्यानंतर, 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपपूर्वी नवीन प्रायोजक मिळवणे ही बीसीसीआयसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
रॉजर बिन्नी यांची कारकीर्द
रॉजर बिन्नी 1983 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे सदस्य आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 27 कसोटी व 72 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्यांनी 47 बळी मिळवले असून, दोन वेळा पाच बळींची कामगिरी केली आहे. तर एकदिवसीय सामन्यांत त्यांनी 77 बळी घेतले आहेत. रॉजर बिन्नी यांना 2022 मध्ये टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात आले. सौरव गांगुली 2019 ते 2022 पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष होते. बीसीसीआयची जबाबदारी स्वीकारणारे बिन्नी हे तिसरे माजी क्रिकेटपटू आहेत.
9 सप्टेंबरपासून रंगणार आशिया कप 2025
आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. 14 सप्टेंबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. इतर कोणत्याही सामन्यापेक्षा या सामन्यातील दोन्ही संघांच्या खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो. यंदा आशिया कप 2025 टी-20 स्वरूपात होणार आहे. या फॉरमॅटमधील आशिया कपची ही तिसरी आवृत्ती आहे. यापूर्वी, भारत आणि पाकिस्तान टी-20 आशिया कपमध्ये 3 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारताने 2 वेळा आणि पाकिस्तानने 1 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय, आशिया कपच्या एकदिवसीय स्वरूपात दोघेही 15 वेळा एकमेकांसमोर आले आहेत, त्यापैकी भारताने 8 वेळा आणि पाकिस्तानने 7 वेळा विजय मिळवला आहे.
हे ही वाचा -





















