Rishabh Pant : रिकी पॉन्टिंगनंतर रिषभ पंतचा नंबर? दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण, सोशल मीडियावर तर्क वितर्क
Rishabh Pant : श्रेयस अय्यरच्या जागी दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन म्हणून रिषभ पंतला संधी देणयात आलीहोती. मात्र, दिल्लीच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती.
नवी दिल्ली : आयपीएल 2024 मध्ये रिषभ पंतनं अपघातानंतर कमबॅक केलं. रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्त्वात दिल्लीनं चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals ) उपांत्य फेरीत धडक मारता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगनं मोठा निर्णय जाहीर केला होता. आयपीएलच्या सात हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कोच म्हणून काम केल्यानंतर रिकी पॉन्टिंगनं या पदावरुन मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. रिकी पॉन्टिंगच्या जागी सौरव गांगुलीला मुख्य प्रशिक्षक केलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर कॅप्टन रिषभ पंत देखील दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आणि अफवा सोशल मीडियावर सुरु झालेल्या आहेत. यासंदर्भातील अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. यामुळं प्रत्येक फ्रेंचायजी त्यांच्या संघात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. याशिवाय कॅप्टन देखील बदले जाऊ शकतात. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत बाबत चर्चांना सुरुवात झालेली आहे. रिषभ पंत अपघातानंतर दीड वर्ष क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळालं होतं. रिषभ पंतनं दिल्ली कॅपिटल्सनं नेतृत्व करताना चांगली सुरुवात केलीहोती. एकदा दिल्लीच्या संघानं प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. दिल्ली कॅपिटल्सला त्यानंतर प्रभावी कामगिरी करता आली नव्हती.
Rishabh Pant could leave Delhi Capitals right before the mega auctions. (Rumours) pic.twitter.com/HeupT2s8Xq
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) July 15, 2024
दिल्ली कॅपिटल्सच्या खराब कामगिरीमुळं रिकी पॉन्टिंगला प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. रिकी पॉन्टिंगनं दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडल्यानंतर रिषभ पंतच्या नावाच्या चर्चा सुरु आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर रिषभ पंत बाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. मेगा ऑक्शन पूर्वी रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडेल. दिल्लीला नवा कॅप्टन शोधावा लागेल, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं.तर, काही नेटकऱ्यांनी रिषभ पंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंह धोनीची जागा घेईल असा दावा देखील केला.
रिषभ पंत किंवा दिल्ली कॅपिटल्सकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दिल्ली कॅपिटल्सनं मोठ्या खेळाडूंना संधी दिली होती. त्यानंतर त्यांना सोडून दिलं होतं. यामध्ये श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल, एबी डिवीलियर्स, डेविड वॉर्नर, संजू सॅमसन यांच्या नावाचा समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्सचं संघ व्यवस्थापन रिषभ पंतला अजून एक संधी देण्याची शक्यता आहे. याशिवाय रिषभ पंत दुसऱ्या टीममध्ये देखील जाण्याची शक्यता कमी आहे. कारण, दुसऱ्या संघात नेतृत्त्व करण्याची संधी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे.
संबंधित बातम्या :