'टीम इंडियामधील युवा खेळाडू आगामी काळात जागतिक क्रिकेटवर राज्य करणार'; रिकी पाँटिंगने जाहीर केलं नाव
Ricky Pointing: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने महत्वाचं विधान केलं आहे.
Ricky Pointing: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गज खेळाडूंनी आयसीसी टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जागा कोण भरुन काढणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने महत्वाचं विधान केलं आहे.
आता भारतीय संघ टी-20 फॉरमॅटमध्ये युवा खेळाडूंसोबत खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत रिकी पाँन्टिंगने अशा खेळाडूबद्दल सांगितले आहे, जो भविष्यात या दिग्गजांसारखा सुपरस्टार बनेल आणि जागतिक क्रिकेटवर राज्य करेल. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवणारा ऋतुराज गायकवाड हा भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार असेल, तसेच तो जागतिक क्रिकेटवर राज्य करेल, असा विश्वास रिकी पाँटिंगला आहे. ऋतुराज गायकवाडने अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत भारताकडून खेळला होता. या मालिकेतील चार सामन्यांमध्ये गायकवाडने 66.50 च्या सरासरीने आणि 158.33 च्या स्ट्राईक रेटने 133 धावा केल्या. विराट कोहलीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे पाहिले जात आहे.
आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने-
ऋतुराज गायकवाडने भारतासाठी आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 633 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही शतक झळकावले आहे. त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतक आहेत. तर गायकवाडने आयपीएलमध्ये एकूण 66 सामने खेळले आहेत. गायकवाडने आयपीएलमध्ये दोन शतके झळकावली आहेत. जगातील सर्वात मोठ्या फ्रँचायझी लीग म्हणून ओळख असलेल्या आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 2380 धावा आहेत.
27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका
झिम्बाब्वेनंतर आता टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तेवढीच एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 27 जुलैला पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे. मात्र, या दौऱ्यासाठी बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही.
रोहित-विराट-बुमराह श्रीलंका दौऱ्यात दिसणार?
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा हे सर्व दिग्गज खेळाडू सध्या सुट्टीवर आहेत. तसेच श्रीलंकाविरुद्धच्या दौऱ्यातही ते सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र रोहित, विराट, बुमराह, जडेजाने एकदिवसीय सामन्यासाठी संघात सामील व्हावे, यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.